"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१० कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:04 IST2026-01-14T17:03:30+5:302026-01-14T17:04:43+5:30
२०० कोटींचा सिंचन प्रकल्प होता, त्याची किंमत ३१० कोटींवर नेण्यात आली. यातील शंभर कोटी रुपये पार्टी फंडासाठी मागण्यात आले होते, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केल्याने राजकारण ढवळून निघाले आहे.

"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१० कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
२९ महापालिकांच्या निवडणुकीचा प्रचार थांबला, पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या विधानाने नवी खळबळ उडाली. अजित पवारांनी महायुतीच्या सरकार असताना पक्षाच्या निधीसाठी प्रकल्पाची किंमत १०० कोटींनी वाढवण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला. इतकंच नाही, तर ती फाईल माझ्याकडे असल्याचा दावाही अजित पवारांनी केला. त्यामुळे राजकारण ढवळून निघाले. याच मुद्द्यावरून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अजित पवारांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले, तसेच त्यांना नवे आव्हान दिले.
२०० कोटींचा प्रकल्पाची किंमत पक्षाच्या निधीसाठी ३१० कोटींवर नेण्यात आली. हे अजित पवारांचे विधान महायुतीमध्येच नव्या वादाला कारण ठरले आहे. १९९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार येण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये भाजपा-शिवसेना युतीचे सरकार होते. त्याच सरकारमध्ये प्रकल्पाची किंमत वाढवण्यात आल्याचा बॉम्ब फोडण्यात आला.
एकनाथ खडसे काय म्हणाले?
पूर्वाश्रमीचे भाजपाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे अजित पवार यांच्या दाव्यावर म्हणाले, "अजित पवार यांनी सिंचन घोटाळा संदर्भात त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे. ती फाईल कोणती आहे, ते धरण कोणते आहे, याची काही माहिती नाही. त्यांनी नुसतं मोघम सांगितले आहे."
"अजित पवारांना २५ वर्षानंतर आता त्याची आठवण झाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे १९९९ मध्ये मी जलसंपदा मंत्री होतो. त्या काळात असा कोणताही निर्णय झाला असेल की, पार्टी फंडासाठी खर्च वाढवून घ्यावा, असे मला आठवत नाही. असे होऊही शकत नाही. कारण शंभर कोटी वाढवायचे असतील, तर इस्टिमेट किंमत हजार बाराशे, पाचशे कोटी असायला हवी. त्यानंतरच १०० कोटी वाढवता येतात", असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
"अजित पवारांनी जी माहिती दिली, ती २५ वर्षे का दडवली? २५ वर्षे तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिले का? मग आता तरी माझी विनंती आहे की, जनतेच्या माहितीसाठी तुमच्याकडे असलेली फाईल खुली करावी आणि त्यामधील सत्यता तपासातून घ्यावी", अशी मागणी खडसे यांनी केली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
"१९९९ मध्ये आघाडीचे सरकार आले. पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. ती मी पाहिली. त्यामध्ये योजनेची रक्कम ३२० कोटी रुपये होती. मी अधिकाऱ्यांना विचारले, तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारने वाढवली", असे अजित पवार म्हणालेले.
"प्रकल्पाची किंमत २०० कोटी रुपये होती, १०० कोटी पार्टी फंडासाठी मागण्यात आले. मग अधिकाऱ्यांनी त्यात त्यांचे १० कोटी वाढवले आणि प्रकल्पाची किंमत ३१० कोटी रुपये झाली. ती फाईल अजूनही माझ्याकडे आहे. ती जर काढली तर हाहाकार माजला असता", असा दावाही अजित पवारांनी केला आहे.