Video: 'दादा, हे बघा तुम्हालाच मत दिलं'; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मतदानाचं FB LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 13:05 IST2019-04-18T12:20:43+5:302019-04-18T13:05:21+5:30
मतदान कोणाला करावे हे सर्वस्वी मतदारावर अवलंबून आहे. मात्र, ते कोणाला केले हे इतरांना कळू नये व मतदाराला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी बंद खोलीमध्ये बॉक्स करून त्याठिकाणी मतदान यंत्रे ठेवण्यात येतात. मात्र, मतदारांनीच या उद्देशाला हरताळ फासला आहे.

Video: 'दादा, हे बघा तुम्हालाच मत दिलं'; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मतदानाचं FB LIVE
मुंबई : महाराष्ट्रात 10 मतदारसंघांमध्ये लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, काही अतिउत्साही मतदारांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास व चित्रिकरण करण्यावर बंदी असतानाही मतदान करतानाचा फोटो, व्हिडिओ काढून उमेदवारांना पाठविला आहे. या प्रकारामुळे गुप्त मतदान करण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
मतदान कोणाला करावे हे सर्वस्वी मतदारावर अवलंबून आहे. मात्र, ते कोणाला केले हे इतरांना कळू नये व मतदाराला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी बंद खोलीमध्ये बॉक्स करून त्याठिकाणी मतदान यंत्रे ठेवण्यात येतात. मात्र, मतदारांनीच या उद्देशाला हरताळ फासला आहे. मतदान करताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मोबाईल आतमध्ये नेण्य़ास बंदी घातलेली असतानाही अनेक मतदारांनी उत्साहाच्या भरात मतदान करतानाचे फोटो काढले आहेत.
उस्मानाबादच्या एका तरुणाने तर फेसबूक लाईव्ह करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे म्हटले आहे. हा तरुण राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तर परभणी मतदारसंघात मतदारांनी कोणाला मतदान केले याचे पुरावेच त्या त्या पक्षांच्या उमेदवारांना पाठविल्याने निवडणूक कर्मचारीही हैराण झाले आहेत.
हे फोटो फेसबुकवर टाकताना 'दादा तुमचा विजय निश्चित', 'दादा तुम्हीच' असे उल्लेख केले आहेत. तर उस्मानाबादच्या या तरुणाने 'माझं मत सिंहाच्या छाव्याला' म्हणत फेसबूक लाईव्ह केले होते. मात्र, अडचणीत येतो असे समजल्यावर त्याने हा लाईव्ह व्हिडिओ डिलिट केला आहे.