व्हायरल क्लिप पंकजा मुंडेवरच बुमरँग; सहानुभूती धनंजय मुंडेंच्याच पाठिशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 13:55 IST2019-10-24T12:34:18+5:302019-10-24T13:55:50+5:30
केवळ सहानुभुतीसाठी व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली, असे आरोप सोशल मीडियावर झाले होते. सुरुवातीला पंकजा यांना मिळत असलेली सहानुभुती धनंजय मुंडे यांच्याकडे वळली. एकूणच व्हिडिओ क्लिपचा फंडा भाजपवरच बुमरँग झाल्याचे परळीत पाहायला मिळाले.

व्हायरल क्लिप पंकजा मुंडेवरच बुमरँग; सहानुभूती धनंजय मुंडेंच्याच पाठिशी
मुंबई - अवघ्या महाराष्ट्राच लक्ष लागलेल्या परळी मतदार संघातील धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातीत लढतीत भावाची सरशी झाली. धनंजय मुंडे यांनी बहिणीला शह देत विजयाची नोंद केली. मतदानाच्या दोन दिवस आधी धनंजय मुंडे यांची कथित व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे पंकजा मुंडे याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु, निकालानंतर व्हिडिओ क्लिप पंकजा यांच्यावरच बुमरँग झाल्याचे दिसून येत आहे.
परळीतून धनंजय मुंडे यांनी विजय मिळवला आहे. 2014 मध्ये त्यांना मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले होते. निवडणुकीपूर्वीच धनंजय-पंकजा लढत चर्चेत होती. महिला व बालविकासमंत्री असलेल्या पंकजा यांनी जिल्ह्यात चांगलेच वर्चस्व निर्माण केले होते. हे वर्चस्व मोडून काढणे धनंजय यांच्यासाठी वाटते तितके सोपं नाही, असं सांगण्यात येत होतं. त्यातच धनंजय मुंडे यांच्यावर महाराष्ट्रात इतर ठिकाणी प्रचार करण्याचे आव्हान होते. त्यामुळे मतदार संघावर लक्ष केंद्रीत करणे त्यांच्यासाठी अवघड होते. हीच स्थिती पंकजा यांच्यासमोरही होती. परंतु, धनंजय यांची यात सरशी झाली.
एकूणच राज्य पातळीवरचे नेते असल्यामुळे परळीची लढत प्रतिष्ठेची झाली होती. त्यातच दोन दिवस आधी धनंजय मुंडे यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात धनंजय यांनी बहिण पंकजा यांच्याविषयी अपशब्द काढल्याचा दावा करण्यात आला होता. तर त्यांना एका सभेत भोवळही आली होती. त्यामुळे वातावरण फिरलं अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र धनंजय मुंडे यांनी वेळीच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तर सोशल मीडियावरही धनंजय मुंडे यांना पाठिंबा दर्शविण्यात येत होता.
केवळ सहानुभुतीसाठी ही क्लिप व्हायरल करण्यात आली, असे आरोप सोशल मीडियावर झाले होते. सुरुवातीला पंकजा यांना मिळत असलेली सहानुभुती धनंजय मुंडे यांच्याकडे वळली. एकूणच व्हिडिओ क्लिपचा फंडा भाजपवरच बुमरँग झाल्याचे परळीत पाहायला मिळाले.