कार्यकर्त्यांना कसं तोंड दाखवायचं? RPI ला मंत्रिपद न मिळाल्याने रामदास आठवले नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 08:45 IST2024-12-16T08:40:12+5:302024-12-16T08:45:02+5:30

मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नाराज

Union Minister Ramdas Athawale upset over Maharashtra cabinet expansion after not getting a single ministerial post | कार्यकर्त्यांना कसं तोंड दाखवायचं? RPI ला मंत्रिपद न मिळाल्याने रामदास आठवले नाराज

कार्यकर्त्यांना कसं तोंड दाखवायचं? RPI ला मंत्रिपद न मिळाल्याने रामदास आठवले नाराज

Ramdas Athawale  On Maharashtra Cabinet Expansion: विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला धूळ चारत २८८ पैकी तब्बल २३५ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर महायुतीचे सरकारचे मुख्यमंत्री म्हणून ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर रविवारी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ३३ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्री असणार आहेत. मात्र यामध्ये महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला एकही मंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे कमालीचे नाराज झाले असून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नागपूरच्या राजभवनमध्ये मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर रामदास आठवले यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. मी आणि माझे कार्यकर्तेही नाराज आहे, असल्याचे रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. विधानसभा निवडणुकीत रामदास आठवले यांच्या पक्षाला दोन जागा देण्यात आल्या होत्या. मात्र त्या जागांवर रामदास आठवले यांनी उमेदवार उभे केले नव्हते. त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना संधी मिळेल असं वाटत होतं. मात्र आता मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने रामदास आठवले यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

"महायुतीचा एक भाग असूनही शपथविधीचं मला निमंत्रण आलं नाही. जेव्हा निवडणुका असतात, तेव्हा मला सगळीकडे नेलं जातं. आता शपथविधीसाठी मला निमंत्रणही मिळालं नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. आमचा समाज मोठ्या संख्यने भाजपबरोबर राहिला. तरीही लोकसभेच्या निवडणुकीत एकही जागा रिपब्लिकन पार्टीला दिली नव्हती. विधानसभेच्या निवडणुकीतही एकही जागा आम्हाला दिली नाही," असं रामदास आठवले म्हणाले.

"आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या, त्यांनी आम्हाला किमान एक विधानपरिषदेची जागा देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पार्टीचा एकही चेहऱ्याला संधी मिळाली नाही. अडीच वर्षांच्या सरकामध्येही आमच्या पक्षाचा एकही मंत्री नव्हता. मला वाटतं की गावागावत आमचे कार्यकर्ते आहेत. पण आता त्यांना कसं तोंड दाखवायचं हा माझ्यापुढे प्रश्न आहे," असंही रामदास आठवले म्हणाले.

"पंतप्रधान मोदींनी मला केंद्रात मंत्रिपद दिलय. पण ज्या कार्यकर्त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं त्यांनाही सत्तेत वाटा मिळाला पाहिजे. आम्ही फडणवीसांची भेट घेतली. यावेळी आरपीआयला संधी मिळेल, असे ते सारखे म्हणायचे. पण आजपर्यंत आम्हाला मंत्रिपदासाठी कोणताही फोन आला नाही. त्यामुळे मीदेखील नाराज आहे. कार्यकर्तेदेखील नाराज आहे. रिपब्लिकन पार्टी मोठा समूह आहे. अशा पार्टीकडे दुर्लक्ष करायला नको होते. दोन मंत्रिपद राहिले आहेत. तिथे रिपाईला संधी मिळावी," असं रामदास आठवले म्हणाले.
 

Web Title: Union Minister Ramdas Athawale upset over Maharashtra cabinet expansion after not getting a single ministerial post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.