बीड प्रकरणात उज्ज्वल निकमांची नियुक्ती? आरोपीसाठी पलंग आणले?; मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 15:40 IST2025-01-02T15:39:09+5:302025-01-02T15:40:44+5:30

पोलिस प्रशासनाने ते पलंग तपासासाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसाठी आणल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे.

Ujjwal Nikam appointment for the Beed case Chief Minister devendra fadnavis reaction | बीड प्रकरणात उज्ज्वल निकमांची नियुक्ती? आरोपीसाठी पलंग आणले?; मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

बीड प्रकरणात उज्ज्वल निकमांची नियुक्ती? आरोपीसाठी पलंग आणले?; मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

CM Devendra Fadnavis: बीडमधील पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आणि सरपंच हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे. मात्र कराड याच्या सेवेसाठी पोलिस विभागाने चार ते पाच पलंग आणल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्षातील इतर नेत्यांनी केला होता. याबाबत उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. प्रसिद्धीचा हव्यास असणारे नेते अशा प्रकारचा आरोप करत असून ते पलंग तपासासाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसाठी आणल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे.

बीड हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना निवदेन दिलं आहे. याबाबत आपण सकारात्मक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले की, "आमदार धस यांनी निवेदन दिल्यानंतर मी उज्ज्वल निकम यांच्याशी फोनवर बोललो आहे. त्यांच्याकडे असलेल्या इतर प्रकरणांचा आढावा घेऊन दोन दिवसांत निर्णय कळवतो, असं त्यांनी सांगितलं आहे. कारण या प्रकरणाला बराच वेळ द्यावा लागणार असल्याने निकम यांनी मला निर्णय घेण्यासाठी एक-दोन दिवस द्यावेत, अशी विनंती केली," अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान, मंत्रालयाची सुरक्षा वाढवण्यासाठी आपण मंत्रालयातील प्रवेशासंदर्भात लवकरच नवी व्यवस्था निर्माण करणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Web Title: Ujjwal Nikam appointment for the Beed case Chief Minister devendra fadnavis reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.