उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 06:10 IST2025-12-25T06:09:40+5:302025-12-25T06:10:55+5:30
“आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर अखेर बुधवारी या दोन्ही बंधुंनी राजकीय युतीची घोषणा केली.

उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
९ मार्च २००६ रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतर तब्बल १९ वर्षांनी दोन्ही भाऊ राजकीय पक्ष म्हणून एकत्र आले आहेत. त्यांच्या एकत्र येण्याची सुरुवात मराठी भाषेच्या मुद्द्यावर ५ जुलै रोजी झाली होती. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात, “आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर अखेर बुधवारी या दोन्ही बंधुंनी राजकीय युतीची घोषणा केली.
जागावाटपाचे काय?
राज ठाकरे यांनी बुधवारी युतीची अधिकृत घोषणा करत जागावाटपाचा तपशील जाहीर न करण्याचा निर्णय सांगितल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी उद्धवसेनेला १५० व मनसेला ७० जागा देण्याबाबत दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादीचे काय?
राष्ट्रवादी (शरद पवार) कडून उद्धवसेनेकडे २२ जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी (शरद पवार) या युतीत सहभागी झाल्यास उद्धवसेनेच्या कोट्यातील जागा त्यांना देण्यात येणार आहेत.
उमेदवारी कधी?
मनसे आणि उद्धवसेना या दोन्ही पक्षांत उमेदवारीसाठी चुरस आहे. त्यामुळे इच्छुकांना जागावाटपाच्या यादीची उत्सुकता लागली आहे. परंतु, यादी जाहीर केल्यास संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांना एबी फॉर्म देण्यावर भर दिला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
युती सगळीकडे असेल?
उद्धवसेना व मनसे ही युती केवळ मुंबईपुरती मर्यादित नाही. तर ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, छत्रपती संभाजीनगर आदी महापालिकांमध्येही दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. या सर्व महापालिकांमधील जागावाटपावरही दोन्ही पक्षांमध्ये तत्त्वतः एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.