Mumbai-Goa highway Traffic मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 12:17 IST2024-09-06T11:22:54+5:302024-09-06T12:17:38+5:30
Mumbai Goa highway Traffic शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

Mumbai-Goa highway Traffic मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल
मुंबई : कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी मुंबईतील चाकरमानी लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. यंदाही गणेशोत्सव सणासाठी अवघे काही तास शिल्लक असल्यानं मुंबईतील चाकरमानी कोकणात आपापल्या गावी जात आहेत. मात्र, त्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे, सुकेळी खिंड, लोणेरे परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. आज सकाळपासून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसमोर विघ्नच विघ्न येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच, मुंबई-गोवा महामार्गावर रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहने सावकाश चालवण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
मंगळवारपासूनच कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आणि गुरुवारी रात्रीपासून हा ओघ आणखी वाढला. या गणेशभक्त एसटी बस, खासगी वाहनं आणि चारचाकी गाड्यांपासून दूचाकीपर्यंत शक्य त्या सर्व वाहनांचा वापर करत कोकणात निघाले आहेत. असे असले तरी त्यांच्यापुढे असणारं वाहतूक कोंडीचे विघ्न मात्र काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. कासवगतीने वाहने पुढे सरकरत आहेत. त्यामुळे वाहनधारकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर देखील मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. बोरघाट पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबईहून येणाऱ्या आणि पुण्याहून जाणाऱ्या दोनही लेनवरून वाहतूक सुरू करून कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत.