Tirupati Devasthan: अखेर तिरुपती देवस्थानची माघार; शिवरायांची मूर्ती असलेल्या गाड्यांना प्रवेश; खासदार बंडू जाधवांनी केली मध्यस्थी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 13:01 IST2022-08-02T12:56:10+5:302022-08-02T13:01:11+5:30
'तिरूपती बालाजी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही.'-खासदार संजय जाधव

Tirupati Devasthan: अखेर तिरुपती देवस्थानची माघार; शिवरायांची मूर्ती असलेल्या गाड्यांना प्रवेश; खासदार बंडू जाधवांनी केली मध्यस्थी
Tirupati Balaji Temple: गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थान चर्चेत आले आहे. चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एक व्यक्ती तिथे गेला असता, त्याच्या गाडीमध्ये लावलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhtrapati Shivaji Maharaj) स्टिकर/मूर्ती काढायला लावली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील लोकांकडून तिरुपती देवस्थानाबद्दल प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. पण, आता अखेर तिरुपती बालाजी देवस्थानाने माघार घेतली असून, यापुढे शिवरायांची मूर्ती घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
संबंधित बातमी- 'तिरुपती देवस्थानचा आदर, पण छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत'
आंध्रप्रदेशमधील प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिरात प्रवेश करताना यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती परभणीचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी दिली. खासदार संजय जाधव सध्या बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेले असून, त्यांनी तिथल्या प्रशासनाशी चर्चा केली आणि या वादावर तोडगा काढला. यानंतर मंदिर प्रशासनासोबत एकत्रित पत्रकार परिषद घेवून त्यांनी याबाबत माहिती दिली.
'यापूढे अडवणूक होणार नाही, पण...'
मीडियाशी संवाद साधताना खासदार जाधव म्हणाले, 'मी मागील 3 दिवसांपासून तिरुमला तिरुपती मंदिरात आहे. व्यास महाराजांचे कथा/किर्तन ऐकण्यासाठी आलो होतो. मंदिराचे मुख्य विश्वस्त ए.व्ही.धर्मा रेड्डी हेदेखील उपस्थित होते. चार दिवसांपूर्वी मी एक फेसबूक पोस्ट बघितली. त्याबाबत देखील मी रेड्डी यांच्याशी चर्चा केली. मात्र अशी कोणतीही अडवणुकीची कृती मंदिर प्रशासनाकडून झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. इथल्या नियमानुसार मंदिराच्या आवारत कोणत्याही राजकीय, सामाजिक पक्षाचा झेंडा, निशाणी, चिन्ह यावर बंदी आहे. मात्र भाविकांकडून गाड्यांत लावण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची, गणपती, हनुमान यांच्या छोट्या मुर्त्यांवर बंदी नाही. त्यामुळे या छोट्या मुर्त्यां गाडीत असल्यास यापुढे देखील मंदिर प्रशासनाकडून कोणतीही अडवणूक होणार नाही,' असे खासदार जाधव यांनी स्पष्ट केले.
'सुरक्षेसाठी सहकार्य करावे'
त्यांनी पुढे सांगितले की, 'अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती गाडीत लावण्यावरून जो वाद चिघळला होता त्यावर बैठकीदरम्यान चर्चा झाली. आपण देवी देवतांच्या प्रतिकृती गाडीमध्ये लावतो तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती लावतो यावर तिरुपती तिरूमला देवस्थानचा कुठचाही आक्षेप नाही. तिरुपती तिरूमला ट्रस्टचे म्हणणे फक्त येणाऱ्या भक्तजणांना कुठच्याही प्रकारची हानी होऊ नये, सुरक्षिते करता जे काही प्रश्न विचारण्यात येतील त्यांना महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील जनतेला सहकार्य करावं एवढेच अपेक्षित आहे,' असेही जाधव म्हणाले.