ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:29 IST2026-01-14T14:26:02+5:302026-01-14T14:29:24+5:30
केंद्रात आणि राज्यात आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी महायुती सत्तेत असावी हे उदिष्ट ठेवून आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन निवडणूक लढवत आहोत असंही उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
मुंबई - आम्ही विकासाच्या मुद्द्यावर चाललोय, त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले. मुंबईत आम्ही साडे तीन वर्ष काम केले. महाराष्ट्रात काम करतोय. समोरच्या लोकांकडे मुद्दे नाहीत. दाखवण्यासारखे काही नाही मग त्यांनी मराठीचा मुद्दा आणला. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे जुने मुद्दे काढले. २०१२, २०१७ आणि त्याआधीपण हेच मुद्दे होते. आता ही शेवटची लढाई, मराठी माणसांच्या अस्तित्वाची लढाई असं बोलतात मात्र ही लढाई मराठी माणसांच्या नाही तर जे हे बोलतायेत त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदेंनी महापालिका निवडणुकांवर भाष्य केले. त्यावेळी ते म्हणाले की, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नसतो. त्यामुळे निवडणुकीचं आव्हान आम्हाला नसते. निवडणुकीची भीती आम्ही घेत नाही. काम करणारे लोक आहेत हे लोकांना माहिती आहे. मी नेहमी लोकांना भेटतो त्यामुळे निवडणुकीत आव्हान वाटत नाही. आमची युती विचारधारेवर झाली आहे. ही युती बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेली आहे. आमची विचारधारा एक आहे. विचारधारेला तडा गेला तेव्हा आम्ही उठाव केला. बाळासाहेबांचे विचार सोडून जेव्हा दुसरा निर्णय झाला तेव्हा आम्हाला उठाव करावा लागला. एनडीए मजबूत कशी होईल यावर नरेंद्र मोदी भर देत आहेत. त्यामुळे त्याची प्रचिती आम्हाला येते. आम्ही बार्गेनिंग करणारी माणसे नाही, आम्हाला काय मिळाले यापेक्षा जनतेला काय देतोय यावर आमचा फोकस आहे असं त्यांनी सांगितले.
जागावाटपापेक्षा मुंबईला काय देणार हे महत्त्वाचे..
त्याशिवाय मुंबईत २२७ जागा होत्या, त्यात ६० पेक्षा जास्त नगरसेवक आमच्याकडे आले होते. त्यामुळे जागावाटप हे ६० पासून पुढे सुरू झाले. त्यानंतर आम्ही कुठे दुसऱ्या नंबरला आहोत, कुठे आम्ही जागा जिंकू शकतो, कुठे भाजपा जिंकू शकतो या लॉजिकवर जागावाटप ठरले. कुठेही अडचण आली नाही. मुख्यमंत्री आणि आम्ही एकत्र बसलो आणि सगळे ठरवले. शेवटी महायुती जिंकणे महत्त्वाचे आहे. जागा कुणाला किती मिळाल्या त्यापेक्षा मुंबईला तुम्हाला काय द्यायचे असेल तर महायुतीची सत्ता आवश्यक आहे. केंद्रात आणि राज्यात आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी महायुती सत्तेत असावी हे उदिष्ट ठेवून आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन निवडणूक लढवत आहोत असंही उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.
दरम्यान, फक्त मुंबईपुरते मर्यादित राहायचे आणि उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर असं उद्धव ठाकरेंचं होते. आताही नगरपालिकेत उद्धव ठाकरे आणि मविआ कुठेही दिसली नाही. मुंबईत फक्त बैठका घेतल्या जायच्या. मुंबई ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. ही आपण राखून ठेवली तर बाकी काय देणे घेणे आहे असं चालत नाही. महाराष्ट्रात कार्यकर्ते असतात. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत त्याच्या मागे उभं राहणे हे नेत्याचे काम असते. प्रमुखाचे काम असते ते केले तरच पक्ष मोठा होता. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केले आणि आजही तेच करतो. माझ्या डोक्यात पद जात नाही असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
मराठी माणसांसाठी तुम्ही काय केले?
तुम्ही मराठी माणसांसाठी काय केले, मराठी माणूस उद्ध्वस्त का झाला, मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला..आम्ही त्याच मराठी माणसांसाठी काम करतोय. SRA प्रकल्प मार्गी लावतोय. १५ वर्ष जो काम करत नाही त्या विकासकाला तुम्ही का काढून टाकले नाही. का प्रकल्प पुढे नेले नाहीत. पंतप्रधान आवास योजनेला आम्ही चालना देऊ. आम्ही १२ हजार गिरणी कामगारांना घरे दिली. १ लाख घरे आणखी देणार आहोत. फक्त मराठी माणूस एवढेच बोलून चालत नाही. आज मराठी माणसाला परवडणारी घरे मुंबईत मिळाली पाहिजे. तुमच्या मागणी आणि पुरवठा यात खूप तफावत आहे. घरे मोठ्या प्रमाणात बांधली जातायेत पण लोकांनी परवडणारी घरे का देता येत नाहीत? मराठी माणसाला परवडणारी घरे, नोकरदार वर्ग, डबेवाला, गिरणी कामगारांना घरे मिळाली पाहिजेत. ज्या इमारतींना ओसी नाही अशा २० हजार इमारतींना ओसी देण्याचं काम आम्ही केले असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.