Baramati Vidhan Sabha: "चूक काय झाली, याचा विचार करून..."; शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 13:56 IST2024-10-29T13:53:20+5:302024-10-29T13:56:19+5:30
Sharad Pawar Ajit Pawar Baramati Vidhan Sabha 2024 : अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांना नाव न घेता लक्ष्य केले. त्यावरून आता शरद पवारांनी काही उलट प्रश्न केले आहेत.

Baramati Vidhan Sabha: "चूक काय झाली, याचा विचार करून..."; शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं
Sharad Pawar on Ajit Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वाक्'युद्ध' सुरू झाले आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजित पवारांनीशरद पवारांना नाव न घेता लक्ष्य केले. अजित पवारांच्या टीकेले आज शरद पवारांनी उत्तर दिले. भाजपच्या मदतीने उपमुख्यमंत्री पद कशाला घेतलं? असा उलट सवाल शरद पवारांनी अजित पवारांना केला.
युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सुरूवात कान्हेरी येथे शरद पवारांच्या उपस्थितीत झाली. यावेळी शरद पवारांनी अजित पवारांना नामोल्लेख न करता घेरलं.
लोकांमध्ये राहायचं पण मंत्रिपद घ्यायचं नाही -शरद पवार
शरद पवार म्हणाले, "तुम्ही मला खुपदा मंत्री केलं. चारदा मुख्यमंत्री काय साधी गोष्ट आहे का? देशाचा संरक्षण मंत्री, देशाचा शेती मंत्री (कृषि मंत्री), आणखी काय द्यायचं लोकांनी? म्हणून मी निर्णय घेतला की, लोकांच्यात राहायचं पण मंत्रिपदाची अपेक्षा करायची नाही."
"जवळपास तीन वेळा लोकांनी आमच्या विचारांचं सरकार निवडून दिलं. उपमुख्यमंत्री कोणाला करायचं? प्रश्न माझ्यापुढे यायचा. आम्ही चर्चा करायचो, चार वेळा उपमुख्यमंत्री बारामतीचा, एकदा नव्हे चार वेळा आणि आपल्या पक्षाचा. पाचव्यांदा यांना पहिल्यांदा भाजपवाल्यांची मदत घेतली", असे खडेबोल शरद पवारांनी सुनावले.
त्यांच्या मदतीने पद कशासाठी घेतलं? शरद पवारांचा सवाल
शरद पवार पुढे म्हणाले, "काय कारण होतं? भाजपवाल्यांनी मतं दिली? पाच वर्षांपूर्वी लोकसभा, विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळी भाजपवाल्यांनी मते दिली नव्हती. तुम्ही दिली होती आणि राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून दिली होती. असं असताना त्यांच्या मदतीने कशासाठी पद घेतलं?", असा उलट सवाल शरद पवारांनी अजित पवारांना केला.
"लोकशाहीमध्ये पद लागतं लोकांची सेवा करायला, पण लोकांची साथ त्यामध्ये कमी असेल, तर आपली चूक काय झाली? कमतरता काय राहिली याचा विचार करून सुधारणा करून लोकांचा विश्वास संपादन करायचा. मी अनेक वेळा विरोधी पक्षाचा नेता होतो. अनेकदा सत्ता माझ्या हातात नव्हती. पण, त्यामुळे लोकांची साथ कधी सोडली नाही", अशा शब्दात शरद पवारांनी अजित पवारांना सुनावले.