अपक्ष नाही, कोणाला पाठिंबाही नाही, कोणाला पाडायचे त्याला पाडा ! मनोज जरांगे यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 06:51 AM2024-03-31T06:51:23+5:302024-03-31T06:52:41+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासह मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) इतर मागण्यांबाबत जे उमेदवार काम करतील, त्यांना मतदान करा. तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले.

There is no independent, there is no support for anyone, knock down whoever you want to knock down! Appeal by Manoj Jarange Patil | अपक्ष नाही, कोणाला पाठिंबाही नाही, कोणाला पाडायचे त्याला पाडा ! मनोज जरांगे यांचे आवाहन

अपक्ष नाही, कोणाला पाठिंबाही नाही, कोणाला पाडायचे त्याला पाडा ! मनोज जरांगे यांचे आवाहन

जालना / वडीगोद्री -  वेळ कमी पडल्याने अपेक्षित अहवाल आलेले नाहीत. त्यामुळे कोणाच्या हट्टापायी उमेदवार देऊन मी समाजाला चिखलात ढकलू शकत नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करणार नाही. कोणाला पाठिंबा देणार नाही. आपण विधानसभेची तयारी सुरू करू मराठा आणि कुणबी एकच आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासह मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांबाबत जे उमेदवार काम करतील, त्यांना मतदान करा. तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.

मनोज जरांगे-पाटील यांनी गावागावांतून आलेल्या अहवालांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी अंतरवाली सराटी येथे बैठक घेतली. दिवसभरात आलेल्या अहवालांचा अभ्यास करून लोकसभेसाठी उमेदवार न देण्याचा अंतिम सार काढला. आरक्षण आणि लेकरांचे वाटोळे होऊ नये यासाठी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा नाही. आपण विधानसभेची तयारी आतापासूनच सुरू करू, असे जरांगे म्हणाले.

आरक्षण आणि लेकरांचे वाटोळे होऊ नये म्हणून...
आरक्षणासाठी महिलांवर लाठीहल्ला झाला. हजारो युवकांवर गुन्हे दाखल झाले. शेकडो युवकांचे बळी गेले. त्यामुळे ज्यांनी आमच्यावर अन्याय केला त्यांना धडा शिकविण्यासाठी निवडणूक लढवायची, असे मत समाजाचे होते. त्यासाठी गावागावांत जाऊन समाजाच्या मतांचा अहवाल आणा, असे सांगितले होते. हा अहवाल अपुरा आहे. राजकारणापुढे आरक्षणाचा प्रश्न मागे पडत आहे. त्यामुळे आरक्षण आणि लेकरांचे वाटोळे होऊ नये यासाठी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा नाही. आपण विधानसभेची तयारी आतापासूनच सुरु करू. मराठाच नव्हेतर, सर्व जाती-धर्माचे लोक देणारे बनवू, आता तुम्हाला कोणाला मतदान करायचे ते करा. पण, ज्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा तो करा, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह धनगर, मुस्लिम, मागासवर्गीय, लिंगायत आणि इतर अनेक समाजाच्या प्रतिनिधींनी आपली भेट घेऊन लोकसभा निडणुकीवर चर्चा केली होती. परंतु, ३० तारखेला मराठा समाजाचा येणारा अहवाल व त्यातील समाजाची भूमिका पाहूनच आपण अंतिम निर्णय घेणार होतो. त्यामुळे आपण कोणालाही पाठिंबा दिला नव्हता, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

राजकारणाला कमी समजू नका
■ राजकारणात भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेता येत नाही. राजकारणाची आणि समाजकारणाची गणिते वेगळी असतात. राजकारणात प्रत्येक मतदाराची मने जिंकावी लागतात. त्याच्या प्रश्नाला हात घालावा लागतो.
■ राजकारण सोपे समजू नका आणि त्यामुळेच आपण जात हारू नये म्हणून हा निर्णय घेत असल्याचेही जरांगे-पाटील म्हणाले.

Web Title: There is no independent, there is no support for anyone, knock down whoever you want to knock down! Appeal by Manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.