निवडणुकीचं मैदान जिंकून घरी पोहोचले मुख्यमंत्री, लेकीच्या गळाभेटीनं 'बाप' सुखावला; देवेंद्र फडणवीस-दिविजाचा हृदयस्पर्शी फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:42 IST2026-01-16T19:38:14+5:302026-01-16T19:42:40+5:30
Maharashtra Corporation Election Results 2026: महानगरपालिकेच्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी लेक दिविजाला मारलेली प्रेमळ मिठी आणि त्यामागे दडलेल्या अनेक भावना.

निवडणुकीचं मैदान जिंकून घरी पोहोचले मुख्यमंत्री, लेकीच्या गळाभेटीनं 'बाप' सुखावला; देवेंद्र फडणवीस-दिविजाचा हृदयस्पर्शी फोटो व्हायरल
महानगरपालिकेच्या निवडणुक(Maharashtra Corporation Election Results 2026) रणसंग्रामाचे निकाल हाती आले. विजयाचा गुलाल उधळला जात आहे, घोषणांचे प्रतिध्वनी उमटत आहेत, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच, या सर्व गदारोळाच्या पलीकडे, सत्ता आणि पदाच्या पलिकडे एका फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, तो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिविजा या बापलेकीच्या प्रेमळ मिठीचा!
आजच्या विजयानंतर महाराष्ट्राचे लाडके नेते देवेन्द्र फडणवीस यांना त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी औक्षण केले आणि लेकीने कडकडून मिठी मारली. तो फोटो एवढा बोलका आहे, की या मिठीत ना विजयाचा उन्माद आहे, ना राजकारण, ना कुणाशी स्पर्धा; तर एका बापाची कृतज्ञता आणि लेकीचे आपल्या वडिलांप्रती असलेले निस्सीम प्रेम.
राजकारणाच्या धकाधकीच्या प्रवासात, रात्रीचा दिवस करत जेव्हा एखादा लोकनेता जनतेच्या प्रश्नांसाठी आणि विजयासाठी झुंजत असतो, तेव्हा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तो त्याचा परिवार. आज महानगरपालिकेच्या निकालानंतर देवेन्द्रजींच्या चेहऱ्यावर विजयाचे समाधान होतेच, पण घरी पोहोचताच जेव्हा लेक दिविजा धावत येऊन त्यांना बिलगली, तेव्हा तो विजय पूर्णत्वास गेला.
ही मिठी बरंच काही सांगून जाते...
त्या एका मिठीत कितीतरी भावना दडल्या होत्या. बाबांची दिवसभराची धावपळ, त्यांनी घेतलेले कष्ट आणि लोकांच्या अपेक्षांचे ओझे पेलताना झालेली दमछाक... या सर्वांवर लेकीची एक मिठी 'जादूची कांडी' ठरली असेल. राजकारणी म्हणून ते कितीही कणखर असले, तरी एका लेकीसाठी ते फक्त तिचे 'बाबा' असतात. तो क्षण सत्तेच्या सिंहासनापेक्षाही कितीतरी पटीने मोठा असतो.
बाप-लेकीचं अतूट नातं
देवेन्द्रजी आणि दिविजा यांचे नाते नेहमीच चर्चेत राहिले आहे. दिविजाच्या डोळ्यांतील तो अभिमान आणि देवेन्द्रजींच्या चेहऱ्यावरील तो निखळ आनंद हेच दर्शवतो की, माणसाला कितीही मोठे यश मिळाले तरी घराच्या उंबरठ्याच्या आत मिळणारी आपुलकीची दाद हीच खरी श्रीमंती असते. विजयाचा गुलाल हवेत विरून जाईल, पण या मायेच्या मिठीची ऊब मात्र आयुष्यभर सोबत राहील.
राजकारणापलीकडचा माणूस
आपण अनेकदा नेत्यांना भाषणांतून, सभांतून आणि टीव्हीवर पाहतो. पण अशा क्षणांतून त्यांच्यातील 'माणूस' आणि 'पिता' आपल्याला भेटतो. हा फोटो केवळ एका विजयाचा आनंद साजरा करणारा नाही, तर एका मुलीने आपल्या वडिलांच्या संघर्षाला दिलेली सर्वात सुंदर पोचपावती आहे.