विधानसभेला ठाकरेंच्या शिलेदाराला कडवं आव्हान देणाऱ्या बंडखोर काँग्रेस नेत्याचे निलंबन मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 15:22 IST2025-07-01T15:21:27+5:302025-07-01T15:22:07+5:30
रामटेकमधील या बंडखोरीमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. रामटेक जागेची अदलाबदल करण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेसने बरेच प्रयत्न केले परंतु ठाकरेंनी ही जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला

विधानसभेला ठाकरेंच्या शिलेदाराला कडवं आव्हान देणाऱ्या बंडखोर काँग्रेस नेत्याचे निलंबन मागे
नवी दिल्ली - गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बंडखोरी केल्याने निलंबित करण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे निलंबन आज औपचारिकरित्या मागे घेण्यात आले. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
आज दिल्ली येथे राजेंद्र मुळक गेले असता त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याबद्दल राजेंद्र मुळक यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. मात्र आज पुन्हा त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुळक यांचे पुन्हा पक्षात स्वागत करून निलंबन मागे घेतल्याचे अधिकृतरित्या घोषित केले.
कोण आहे राजेंद्र मुळक?
राजेंद्र मुळक हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे आघाडी होती. त्यात नागपूरातील रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच होती. या जागेवर २०१९ साली आशिष जयस्वाल निवडून आले होते. त्यामुळे ही जागा शिवसेनेची आहे ती सोडावी असा आग्रह ठाकरे गटाने काँग्रेसकडे केला. अखेर दोन्ही बाजूच्या चर्चेत रामटेकची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली. मात्र यावरून नाराज झालेल्या राजेंद्र मुळक यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.
रामटेकमधील या बंडखोरीमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. रामटेक जागेची अदलाबदल करण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेसने बरेच प्रयत्न केले परंतु ठाकरेंनी ही जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला. त्यामुळे या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा झाला. त्यात रामटेक मतदारसंघात राजेंद्र मुळक यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यामुळे ठाकरे गटाची कोंडी झाली. याठिकाणी ठाकरे गटाने विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली. परंतु या मतदारसंघात ना ठाकरे गट, ना अपक्ष राजेंद्र मुळक यांच्याऐवजी महायुतीकडून आशिष जयस्वाल यांचा विजय झाला.