“लोकसभेला ठाकरे गटाच्या १३ हून जास्त जागा येतील, महाराष्ट्र धर्म...”; सुषमा अंधारेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 23:02 IST2024-04-22T23:00:59+5:302024-04-22T23:02:40+5:30
Thackeray Group Sushma Andhare News: भाजपच्या संगतीला राहिलेली शिवसेना त्या विचारांनी प्रभावित झाली होती. आता ती शेड बाजूला गेली आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

“लोकसभेला ठाकरे गटाच्या १३ हून जास्त जागा येतील, महाराष्ट्र धर्म...”; सुषमा अंधारेंचा दावा
Thackeray Group Sushma Andhare News: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान काही दिवसांवर आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, नेते, पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारावर भर देताना दिसत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची भर पडली आहे. या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे १३ हून जास्त उमेदवार जिंकून येतील, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
निवडणूक लढवण्याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी सांगितले की, लोकसभा किंवा विधानसभा लढण्याची तयारी माझी नाही. कनिष्ठ मध्यमवर्गी आहे. कोणत्याही जाती धर्मात न गुंतता, महाराष्ट्र धर्म वाढवण्याची लढाई शिवसेनेला लढायची होती, त्यासाठी शिवसेना कटिबद्धपणे काम करत आहे. विधानसभा माझ्या डोक्यात नाही. मात्र, या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट १३ पेक्षा जास्त जागा जिंकेल, असे अंधारे यांनी म्हटले आहे.
जेव्हा नवनीत राणा म्हणतात की, उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, तेव्हा त्याचा अर्थ काय काढायचा? जेव्हा एखाद्या वेळेला एखादी गोष्ट चूक वाटण फार स्वाभाविक आहे. भाजपच्या संगतीला राहिलेली जी शिवसेना होती, ती भाजपाच्या विचारांनी प्रभावित झाली होती. आता ती शेड बाजूला गेली आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात सुषमा अंधारे बोलत होत्या.
दरम्यान, राज ठाकरे तिकडे का गेले? तर त्यांच्याकडून एक कारण आहे. राज ठाकरेंकडून एक उत्तर आहे की, उद्धव ठाकरे जिथे कुठे असतील, त्याच्या विरोधी बाकावर मी असेन. रवींद्र वायकर लॉयल वाटायचे. अर्जुन खोतकर यांच्याबद्दल आमच्याकडे खरच चर्चा होते. चांगला माणूस आहे पण अडचणीत आला. किमान जाताना त्याने प्रामाणिकपणे सांगितले. माझी अडचण आहे म्हणून मी जातो, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.