‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 21:31 IST2025-12-26T21:31:05+5:302025-12-26T21:31:34+5:30
Solapur Municipal Corporation Election: पालिका निवडणुकीतही उमेदवारीमध्ये नव्याने आलेल्यांनाच प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता असल्याने भाजपातील जुने कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे.

‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यापासून सत्ताधारी महायुतीमधील मुख्य पक्ष असलेल्या भाजपामध्ये विरोधी पक्षांमधून नेते आणि कार्यकर्त्यांचं मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झालं आहे. तसेच विविध ठिकाणी भाजपामध्ये जोरदार पक्षप्रवेशही होत आहेत. मात्र आता पालिका निवडणुकीतही उमेदवारीमध्ये नव्याने आलेल्यांनाच प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता असल्याने भाजपातील जुने कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामधूनच सोलापूरमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुभाष देशमुख यांनी सूचक विधान करत पक्षाला इशारा दिला आहे.
होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही, तर ते ज्या पक्षात जातील तिथे त्यांचा प्रचार करणार, असा इशारा देशमुख यांनी दिला आहे. सोलापूरमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरमध्ये निष्ठावंत पॅटर्न सुरू केला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट न मिळाल्यास ते महायुतीमधील इतर पक्षात जातील आणि तिथे आम्ही त्यांचा प्रचार करू अशी भूमिका देशमुखांनी घेतली आहे.
दरम्यान, अगदी पंधरा दिवसांपूर्वी भाजपात आलेले लोक आमच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. इच्छूक उमेदवार निवडणुकीत किती खर्च करणार, त्यांची किती क्षमता आहे, याबाबतही या मुलाखतींमधून विचारलं जात आहे, याबाबत सुभाष देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.