पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 19:25 IST2024-10-16T19:25:34+5:302024-10-16T19:25:34+5:30
आगामी काळात कोपरगाव मतदारसंघात नेमक्या काय घडामोडी घडतात आणि कोल्हे कुटुंबाची राजकीय दिशा काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
Devendra Fadnavis ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आज भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चर्चा असतानाच ही भेट झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ देणे पसंत केले. त्यामुळे शरद पवार हे या मतदारसंघात नवीन चेहऱ्याच्या शोधात असल्याचं दिसत आहे. त्यातच विवेक कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी पवार यांची भेट घेतल्याने ते लवकरच तुतारी हाती घेतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज त्यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, भाजपला सोडचिठ्ठी देण्याआधी यापूर्वी समरजीतसिंह घाटगे, हर्षवर्धन पाटील आणि अन्य नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपली बाजू मांडली होती. त्यामुळे स्नेहलता कोल्हे यांनी आज घेतलेली भेटही याच कारणासाठी होती का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात कोपरगाव मतदारसंघात नेमक्या काय घडामोडी घडतात आणि कोल्हे कुटुंबाची राजकीय दिशा काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.