Maharashtra Politics: “२२ वर्षांपासून कामाख्या देवीला जातोय”; शिंदे गटाच्या ऑफरवर चंद्रकांत खैरेंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:40 IST2022-11-24T12:39:36+5:302022-11-24T12:40:59+5:30
Maharashtra News: हे लोकं मंत्रिपद टिकावे, या स्वार्थासाठी जातात. परंतु उद्धव ठाकरेंचा विजय व्हावा, यासाठी कामाख्या देवीच्या दर्शनाला जातो, असे चंद्रकांत खैरेंनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: “२२ वर्षांपासून कामाख्या देवीला जातोय”; शिंदे गटाच्या ऑफरवर चंद्रकांत खैरेंचा पलटवार
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी मोठे सत्तानाट्य पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीला पक्षाच्या ५५ पैकी ४० आमदारांनी साथ दिली. एक एक करत ठाकरेंकडील आमदार सूरतला गेले. त्यानंतर एकनाथ शिंदेंसह या सर्व आमदारांचा मुक्काम गुवाहाटीला झाला. राज्यातील राजकीय घडामोडीत गुवाहाटीचे महत्त्व अधिक वाढले. त्यातच एकीकडे मध्यावधीच्या निवडणुकीची चर्चा सुरू असताना आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह गुवाहाटीला जाणार असल्याचे समोर आले आहे.
येत्या २१ नोव्हेंबरला शिंदे समर्थक आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. यातच जर मी गुवाहाटीला गेलो नसतो तर तुमच्यासमोर उद्योगमंत्री म्हणून बसलो नसतो. गुवाहाटीला गेलो म्हणूनच मी उद्योगमंत्री झालो, असे उद्योगमंत्री उदय सामंत अलीकडेच सांगितले. तसेच ठाकरे गटातील काही नेत्यांना गुवाहाटीला येण्याची ऑफर दिल्याचे म्हटले जात आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उदय सामंतांवर पलटवार केला आहे.
कामाख्या देवीला मी खूप मानतो
उदय सामंत यांना सांगावे की, मी गेली २२ वर्ष गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीच्या दर्शनाला जातो. हे आत्ता जात आहेत. मध्यंतरी हे जाऊन आल्यानंतर मी तिथे गेलो होतो. माझ्या पद्धतीने जाऊन तिथे पूजा केली. आता सुद्धा हे लोकं जाऊन आल्यानंतर मी पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे. कामाख्या देवीला मी खूप मानतो, या शब्दांत चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाला सुनावले.
स्वार्थासाठी देवीकडे मागायला जात नाही
कामाख्या देवीकडे स्वार्थासाठी काही मागायला जात नाही. मी श्रद्धेने देवीकडे जातो. हे लोकं त्यांचे मंत्रिमंडळ टिकावे, यासाठी जातात. मात्र, आम्ही उद्धव ठाकरे यांचा विजय व्हावा, यासाठी जातो, असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. तसेच रात्रीपर्यंत आमच्यासोबत असणारे उदय सामंत अचानक पहाटे गुवाहाटीसाठी रवाना झाले. विशेष म्हणजे हरिद्वारच्या एका माणसाचा मला पहाटे फोन आला. मी श्रद्धाळू असल्याने अनेकदा हरिद्वारलाही गंगा स्नानासाठी गेलो आहे, असा एक किस्सा चंद्रकांत खैरे यांनी सांगितला.
दरम्यान, माझ्या धर्मासाठी, पक्षासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मी तिथे जात असतो. तुम्ही आधी तिथे जाऊन तर या मग आम्ही जातो, असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"