शिंदे-फडणवीसांची बंद दाराआड बैठक, महापालिका निवडणुकीबद्दल मोठा निर्णय; नेत्यांच्या फोडाफोडीवरही चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 09:07 IST2025-12-09T09:03:43+5:302025-12-09T09:07:09+5:30
Eknath Shinde Devendra Fadnavis: नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्येच संघर्ष झाला. हा राजकीय संघर्ष थांबवण्याचे संकेत दिले गेले होते. त्यानुषंगाने एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झाली.

शिंदे-फडणवीसांची बंद दाराआड बैठक, महापालिका निवडणुकीबद्दल मोठा निर्णय; नेत्यांच्या फोडाफोडीवरही चर्चा
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षांतील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला. विशेषतः शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष राज्यभरात चर्चेचा विषय ठरला. पण, आता हा संघर्ष शमवण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी (८ डिसेंबर) मध्यरात्री नागपूरमध्ये एक बैठक झाली. या बैठकीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेनंतर दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
एएनआयने शिवसेनेतील सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, चव्हाण आणि बावनकुळे या नेत्यांमध्ये गेल्या काही काळात झालेल्या राजकीय संघर्षावर चर्चा झाली. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भाजपच्या नेत्यांना थेट लक्ष्य करताना दिसले. दोन्ही पक्षातील हा वाद थांबवण्यासाठी आगामी निवडणुकीबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
सर्व महापालिका महायुती एकत्र लढणार
या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील सर्व महापालिका महायुतीतील सर्व पक्ष एकत्र लढणार, असा निर्णय झाला. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तिन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांच्या बैठका पुढील दोन-तीन दिवस सुरू होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी भाजपने अशी भूमिका घेतली होती की, मुंबई महापालिका महायुती एकत्र लढणार आणि राज्यातील उर्वरित महापालिका भाजप स्वबळावर लढणार. मात्र, ही भूमिका आता भाजपने बदलली आहे. मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत न घेण्याची भूमिका दोन्ही पक्षाची असल्याचेही सूत्रांनी सांगितले. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर जागावाटपासंदर्भातील बैठका सुरू होणार आहेत.
एकमेकांच्या पक्षातील नेत्यांची फोडाफोडी बंद
ज्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत वाद उफाळला होता, त्यावरही चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच महायुतीतील तिन्ही पक्षामध्ये नेते, पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी सुरू झाली होती. हा वाद शिगेला गेल्याचे पाहायला मिळाले.
फडणवीस, शिंदे, चव्हाण आणि बावनकुळे यांच्यात झालेल्या बैठकीत महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देणार नाही, असे ठरल्याचेही सूत्रांनी सांगितले.