'यामुळे' आष्टी मतदार संघाची उमेदवारी पवारांनी ठेवली 'पेंडींग' !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 16:54 IST2019-09-18T16:51:22+5:302019-09-18T16:54:40+5:30
सुरेश धस यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपनेते बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून आजबे विधानसभेसाठी इच्छूक आहे. कदाचित त्यांच्याच झोळीत उमेदवारीची माळ पडू शकते.

'यामुळे' आष्टी मतदार संघाची उमेदवारी पवारांनी ठेवली 'पेंडींग' !
मुंबई - एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची अवस्था २०१९ येईपर्यंत बिकट झाली आहे. दिग्गज नेते सोडून गेल्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली. जयदत्त क्षीरसागर आणि सुरेश धस यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला मोठे धक्के बसले. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील पाच मतदार संघांतील उमेदवारांची नावे स्वत: जाहीर केली. परंतु, आष्टी मतदार संघांची उमेदवारी कोणाला हे गुलदस्त्यातच ठेवले आहे. त्यामुळे या मतदार संघाविषयीची उत्सुकता अजुनच वाढली आहे.
२०१४ मध्ये या मतदार संघातून सुरेश धस यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना भीमराव धोंडे यांनी धस यांना पराभूत केले होते. त्यानंतर काही दिवसांतच धनंजय मुंडे एकाधिकारशाही करत असल्याचा आरोप करत धस यांनी राष्ट्रवादीला रामराम करून पंकजा मुंडे यांना बीड जिल्हा परिषदेत सत्तास्थापन करण्यासाठी मदत केली. धस यांना याचा मोबदलाही मिळाला. पंकजा यांनी धस यांना विधान परिषदेवर पाठवून परफेड केली. तर धस यांच्या भाजपमध्ये जाण्यामुळे राष्ट्रवादीची आष्टीतील ताकद कमी झाली आहे.
दरम्यान शरद पवार यांनी आज बीड, गेवराई, परळी, केज आणि माजलगाव येथील उमेदवारांची नावे जाहीर केली. परंतु, आष्टी मागे ठेवले. आष्टीतून भाजपकडून सुरेश धस आपल्या मुलाला विधानसभेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर विद्यमान आमदार भीमराव धोंडेंनी देखील प्रयत्न सुरू केले आहे. भाजपकडून या दोघांपैकी कोणाला तिकीट मिळणार यावर राष्ट्रवादीची उमेदवारी अवलंबून असणार किंवा आष्टीतून राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार नसल्यानेच उमेदवारी जाहीर झाली नसल्याची शक्यता आहे.
सुरेश धस यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपनेते बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून आजबे विधानसभेसाठी इच्छूक आहे. कदाचित त्यांच्याच झोळीत उमेदवारीची माळ पडू शकते. मात्र भाजपची उमेदवारी कोणाला यानंतरच राष्ट्रवादीची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे.