भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:38 IST2026-01-12T17:35:27+5:302026-01-12T17:38:09+5:30
AIMIM सोबत युती केल्यानं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांना नोटीस बजावली होती.

भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
अकोला - अकोट नगरपरिषदेत भाजपा आणि एमआयएमच्या युतीवरून देशभरात चर्चा झाली होती. या अभद्र युतीमुळे भाजपा नेत्यांची कोंडी झाली. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर नाराजी व्यक्त करत स्थानिक भाजपा आमदाराला नोटीसही बजावली. त्यानंतर घडलेल्या घडामोडीत भाजपा आणि एमआयएम यांची युती तुटली. आता एमआयएमच्या नगरसेवकांनी स्वतंत्र गट बनवला आहे. परंतु कागदोपत्री तुटलेल्या युतीचा दुसरा अंक आज अकोटमध्ये पाहायला मिळाला.
अकोट नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक प्रक्रियेत एमआयएमकडून भाजपाच्या माजी नगराध्यक्षांचे सुपुत्र जितेन बरेठिया यांना समर्थन देण्यात आले. भाजपा नेत्याच्या मुलाला एमआयएमच्या पाठिंब्यावर स्वीकृत नगरसेवक बनवल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली. एमआयएमकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी ताज राणा यांचं नाव समोर आले. त्यासोबतच भाजपाचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचा मुलगा जितेन बरेठिया यांनाही उमेदवारी दिली होती. ऐन निवड प्रक्रियेवेळी वेळ निघून गेल्याचं कारण देत ताज राणा यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आला. त्यामुळे जितेन बरेठिया एकमेव स्वीकृत नगरसेवक बनले. या प्रक्रियेविरोधात ताज राणा कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे.
AIMIM सोबत युती केल्यानं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांना नोटीस बजावली होती. तुमच्या कृतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली त्यामुळे तुमच्यावर कारवाई का करू नये असा खुलासा त्यांच्याकडून मागण्यात आला. परंतु अद्याप यावर कुठलीही कारवाई पक्षाकडून झाली नाही. यातच पुन्हा एकदा स्वीकृत नगरसेवक सदस्यामुळे भाजपा आणि एमआयएम युतीचा दुसरा अंक इथल्या जनतेला पाहायला मिळाला आहे.
काँग्रेसने भाजपा आणि एमआयएमवर साधला निशाणा
दरम्यान, भाजपा आणि एमआयएम हे एकच पक्ष आहेत. हे दोघे एकमेकांचे भाऊ आहेत. एक हिंदूंबाबत बोलतो, दुसरा मुस्लिमांवर बोलतो. त्यानंतर दोघे एकमेकांसोबत चर्चा करतात. भाजपा आणि एमआयएम हे निवडणुकीत वेगळे लढले मात्र स्वीकृत नगरसेवकपदासाठी एकत्र आले. त्यामुळे एमआयएम पक्षाचा खरा चेहरा लोकांसमोर आला. एमआयएम भाजपाची बी टीम नसून त्यांचाच सहकारी पक्ष आहे. त्यामुळे जनतेने मतांची विभागणी करू नये. आधी भाजपासोबत युती केली आणि आता भाजपाच्या नेत्याच्या मुलाला स्वीकृत सदस्य बनवले असा आरोप काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी केला.