RSS च्या कामाचे शरद पवारांनी कौतुक करताच राऊतांनी 'दुसरी बाजू' दाखवली; युगेंद्र पवारांचं नाव घेत 'आकडेवारी' मांडली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 11:40 IST2025-01-09T10:49:03+5:302025-01-09T11:40:36+5:30
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत आरएसएसने केलेल्या कामाचे कौतुक केले.

RSS च्या कामाचे शरद पवारांनी कौतुक करताच राऊतांनी 'दुसरी बाजू' दाखवली; युगेंद्र पवारांचं नाव घेत 'आकडेवारी' मांडली!
Sanjay Raut on Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला ५० जागांचा आकडाही गाठता आलेला नाही. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या प्रचाराचे कौतुक केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय आढावा बैठकीत बोलताना विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आखलेल्या व्यूहरचनेचे शरद पवार यांनी एका बैठकीत कौतुक केले आहे. महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीच्या विजयात गाफील राहिली असंही शरद पवार म्हणाले. यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संघाने बुथ यंत्रणा ताब्यात घेतल्याचे म्हटलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"शरद पवार यांच्यासोबत आमची वारंवार चर्चा झाली आहे. ईव्हीएम हा एक विषय आहेच. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आणि संघ परिवाराच्या लोकांनी बुथ मॅनेजमेंट ज्या पद्धतीने राबवले ते कौतुकास्पद होतं. प्रत्येक बुथवर मते कशी वाढवायची यासाठी त्यांनी काम केले. याचा त्यांना फायदा झाला. प्रत्येक बुथवर नक्कीच गैरप्रकार झाले आहेत आणि ते आम्ही समोर आणलं आहे. तसं नसतं तर प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यातला फरक दिसला नसता. बुथ यंत्रणा ताब्यात घेऊन मत टाकण्यात आली आहे. त्याचा हिशोब लागत नाहीये. हे जर आरएसएसने केलं असेल तर त्याचं कौतुक मी करणार नाही," असं संजय राऊत म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर महाविकास आघाडी गाफिल राहिली हे शरद पवारांचे वक्तव्य पटतं का असा सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना, "विधानसभा निवडणुकीत विजयाची आम्हाला खात्री होती पण गाफील कोणीच नव्हतं. प्रत्येक उमेदवाराने आपली यंत्रणा ताकदीने राबवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनीही त्यांची यंत्रणा राबवली. बारामती मतदारसंघात युगेंद्र पवार काय गाफील होते का? खूप कष्ट करत होते. लोकांनी जीवापाड मेहनत केली आहे. पण प्रत्येक बुथवर घोटाळे झाले आहेत त्यामुळे आम्ही हरलो," असं संजय राऊत यांनी म्हटलं.