“राहुल गांधींचे काम देश जोडणारे, भाजपाला लोकसभेत जनतेने उत्तर दिले, आता...”: रमेश चेन्नीथला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 18:47 IST2024-09-13T18:45:29+5:302024-09-13T18:47:53+5:30
Congress Ramesh Chennithala News: राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढून देश जोडण्याचे काम केले. डरो मत असा संदेश दिला, असे सांगत रमेश चेन्नीथला यांनी भाजपावर टीका केली.

“राहुल गांधींचे काम देश जोडणारे, भाजपाला लोकसभेत जनतेने उत्तर दिले, आता...”: रमेश चेन्नीथला
Congress Ramesh Chennithala News: महाराष्ट्रातील सरकार सर्वांत घोटाळेबाज सरकार आहे. पंतप्रधानांनी अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यांनाच सत्तेत घेतले. भाजपा युती सरकार आयाराम गयाराम सरकार आहे, या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवण्यास राज्यातील जनता तयार आहे. विदर्भाची जनतेने नेहमीच काँग्रेस साथ दिली आहे आता विधानसभा निवडणुकीही ते अशीच साथ देतील असा विश्वास काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार व गोंदियाचे भाजपा नेते गोपाल अग्रवाल यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना रमेश चेन्नीथला यांनी भाजपावर जोरदार टीका केली. तसेच राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या विधानावरून भाजपा करत असलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
राहुल गांधींचे काम देश जोडणारे
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपाने कोट्यवधी रुपये खर्च केले, खासदारकी रद्द केली, शासकीय घर काढून घेतले, ईडीची चौकशी मागे लावली. पण, देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला चोख उत्तर देत काँग्रेस इंडिया आघाडीला साथ दिली. भाजपा व काँग्रेसमध्ये विचारधारेची लढाई आहे. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढून देश जोडण्याचे काम केले. डरो मत असा संदेश दिला. काही शक्ती देशाचे विभाजन करु पाहत आहेत त्यांना उत्तर देण्याची आता वेळ आली आहे, असे रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपा सरकार बहिणींच्या साडीवर १८ टक्के जीएसटी लावून लुटते आणि १५०० रुपये देते. भाजपा बजरंग बलीच्या नावाने, श्रीरामाच्या नावाने मते मागते पण लोकसभा निवडणुकीत त्यांना श्रीराम पावले नाहीत आणि बजरंग बलीही पावले नाहीत. जेव्हा जेव्हा विदर्भाची काँग्रेसला साथ मिळते त्या त्या वेळेस महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता येते. विदर्भ काँग्रेसची भूमी आहे, या मातीतच भारतीय जनता पक्षाला गाडून विजयाची पताका उभारु. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष १०० पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.