भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 16:41 IST2024-10-30T16:40:34+5:302024-10-30T16:41:35+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरे म्हणाले, "कसं आहे आता, मुलंही आहेतच की आणि भुजबळही पुतण्यासोबतच गेले ना... ते थोडी काकांबरोबर थांबले. मला असं वाटतं की, किमान भुजबळांनी तरी काकांची साथ सोडायला नको होती. यावर तुमची सहानुभूती पुतण्यांसाठी आहे? असे विचारले असता राज म्हणाले, भुजबळांसांठी निश्चित नाही."

भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देत नांदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात योवला येथे पत्रकारांसोबत बोलता, शरद पवार यांचे पुतणे अजित पवार, अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार, गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे व बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे, अशा अनेक पुतणे कंपनीने आपल्या काकांचे ऐकलेच आहे, असे वाटत नाही. राजकारणात या पुतणे कंपनीचा डीएनए वेगळाच आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून आता, "भुजबळांनी एक पक्ष काढावा आमचा," असा खोचक सल्ला राज ठाकरे यांनी भुजबळांना दिला आहे. ते एबीपी माझ्यासोबत एका मुलाखतीत बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, "कसं आहे आता, मुलंही आहेतच की आणि भुजबळही पुतण्यासोबतच गेले ना... ते थोडी काकांबरोबर थांबले. मला असं वाटतं की, किमान भुजबळांनी तरी काकांची साथ सोडायला नको होती. यावर तुमची सहानुभूती पुतण्यांसाठी आहे? असे विचारले असता राज म्हणाले, भुजबळांसांठी निश्चित नाही."
अजित पवारांची स्तुती -
राज ठाकरे पुढे म्हणाले, "मला आजित पवारांसंदर्भातील एकच गोष्ट आवडते. मला त्यांचं बाकीचं राजकारण फारसं आवडत नाही अथवा बाकीच्या गोष्टीतर नाहीच आवडत. पण एक गोष्ट अजित पवारांची आवडते. त्यांनी जात-पात कधी मानली नाही किंवा जातीपातीच्या राजकारणात ते कधी अडकले नाही. म्हणजे शरद पवार आजपर्यंत जे करत आले, त्यात एवढ्या वर्षात अजित पवार कुठे, ही गोष्ट करताना तुम्हाला दिसणार नाहीत. ही मी बघत असलेली एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे."