लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:14 IST2026-01-07T17:03:42+5:302026-01-07T17:14:03+5:30
या दोघांचीही मते कमी झाली आहेत. जर २००९ साली हे दोघे एकत्र आले असते तर कदाचित तेव्हाचे राजकारण बदलले असते. परंतु आता या युतीचा फारसा प्रभाव नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
मुंबई - महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीमुळे महायुतीसमोर आव्हान उभं राहिलंय का असा प्रश्न सगळीकडे चर्चेत आहे. मात्र या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. ठाकरे बंधू युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा पराभव होईल हे लिहून ठेवा असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही. या दोघांचीही मते कमी झाली आहेत. जर २००९ साली हे दोघे एकत्र आले असते तर कदाचित तेव्हाचे राजकारण बदलले असते. परंतु आता या युतीचा फारसा प्रभाव नाही. या निवडणुकीनंतर राज ठाकरे यांचा सर्वात पराभव होईल हे लिहून घ्या. या युतीत राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना मिळेल परंतु उद्धव ठाकरेंचा फायदा राज यांना मिळणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच "Raj Thackeray Will Be Biggest Loser" ही माझी भविष्यवाणी आहे. ती निवडणुकीनंतर तुम्ही पाहू शकता. मागील २५ वर्ष मराठी माणसांचा विश्वास ठाकरेंनी गमावला आहे. मुंबईतून मराठी माणूस बाहेर का गेला, तुम्ही इतकी वर्ष सत्तेत होता. मराठी माणसांना मुंबईत घर का मिळाले नाही. मराठी माणसांना वसई विरार नालासोपारा इथे का जावे लागले असा सवालही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधू यांना विचारला आहे.
दरम्यान, २०१७ साली आम्ही मुंबई महापालिकेत सत्तेबाहेर राहिलो, आम्ही त्यांच्यासोबत गेलो नव्हतो. ज्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत होतो तेव्हा महापालिकेत २ प्रमुख पदे असतात. एक महापौर आणि एक स्थायी समिती अध्यक्षपद...२५ वर्षात एकदाही आमचा महापौर असो वा स्थायी समिती अध्यक्ष बनले नाहीत. त्यांच्याकडेच सत्ता होती. महापालिका हेच चालवत होते. आम्हाला विचारतही नव्हते. घोटाळे सुरू होते. २०१५ साली मी मुख्यमंत्री असताना मुंबईतील २०० रस्त्यांच्या कामांची चौकशी केली. त्यात एफआयआरही केला. अनेकजण जेलमध्ये गेले इतका भ्रष्टाचार यांनी केला आहे असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.