विधानसभाध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर अर्ज भरला, आज बिनविरोध निवड होणार, विरोधकांचा उमेदवार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 06:02 IST2024-12-09T06:02:10+5:302024-12-09T06:02:37+5:30
२०२२ मध्ये भाजप-शिंदेसेनेचे सरकार आले, तेव्हा नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

विधानसभाध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर अर्ज भरला, आज बिनविरोध निवड होणार, विरोधकांचा उमेदवार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपचे कुलग्या मुंबईतील आमदार अॅड. राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष होणार आहेत. या पदासाठी रविवारी त्यांनी अर्ज भरला. त्यांचा एकट्याचा अर्ज असल्याने या पदावर त्यांची बिनविरोध निवड सोमवारी होणार हे निश्चित झाले.
विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांची नावे चर्चेत होती. मात्र, भाजपने नार्वेकर यांनाच पसंती दिली. २०२२ मध्ये भाजप-शिंदेसेनेचे सरकार आले, तेव्हा नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आता ते दुसऱ्यांदा या पदावर निवडून येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्ती मानले जातात.
उपाध्यक्षपद देण्याची विरोधकांची मागणी
महाविकास आघाडीने अध्यक्षपदाचा उमेदवार दिलेला नाही, पण आम्हाला उपाध्यक्षपद द्या, अशी मागणी मविआच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांना भेटून केली. उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना देण्याची पूर्वी परंपरा होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विश्वासदर्शक ठराव आज
देवेंद्र फड़णवीस यांच्या सरकारवर विश्वास व्यक्त करणारा ठराव सोमवारी विधानसभेत मांडण्यात येणार आहे. शिंदे सेनेचे उदय सामंत, भाजपचे डॉ. संजय कुटे, अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील आणि अपक्ष रवी राणा हा विश्वासदर्शक ठराव मांडतील.
नागपूर अधिवेशनाचा कार्यक्रम आज ठरणार
नागपूरचे विधिमंडळ अधिवेशन किती दिवसांचे असेल, याचा निर्णय सोमवारी विधानभवनात होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. अधिवेशन २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ते २१ डिसेंबरपर्यंत चालणार अशी शक्यता असली, तरी अंतिम निर्णय उद्याच्या बैठकीत होईल.