पुष्पाची क्रेझ संपेना! दहावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेत सर्वपल्ली ऐवजी लिहिले 'श्रीवल्ली'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:41 IST2022-02-13T14:41:15+5:302022-02-13T14:41:41+5:30
तरुणांपासून शाळकरी मुलांपर्यंत अनेकांवर पुष्पा चित्रपटाने भुरळ पाडली आहे.

पुष्पाची क्रेझ संपेना! दहावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेत सर्वपल्ली ऐवजी लिहिले 'श्रीवल्ली'
सातारा: अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा (Pushpa) चित्रपटाने देशात धुमाकूळ घातला आहे. एका विद्यार्थ्यांवर तर चित्रपटाचा इतका फिव्हर चढला की, त्याने दहावीच्या सराव पेपरमध्ये 'सर्वपल्ली' राधाकृष्णन लिहिण्याऐवजी 'श्रीवल्ली' राधाकृष्णन लिहिलं. याचा एक फोटोही सध्या व्हायरल होत आहे.
'पुष्पा' चित्रपटाने देशभर धुमाकूळ घातला असून त्यातील डॉयलॉग आणि गाण्यांची स्टाईल कॉपी करुन अनेकजण लोकप्रिय होत आहेत. प्रत्येकाच्या तोंडात या चित्रपटांची गाणी आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत, पण विद्यार्थ्यांवरील पुष्पाचा फिव्हर कमी होत नाहीये. असाच एक पुष्पा फिव्हर चढलेला दहावीचा विद्यार्थी त्याच्या सराव पेपरमध्ये 'सर्वपल्ली'ऐवजी 'श्रीवल्ली' लिहून मोकळा झाला.
कुठे घडला प्रकार ?
फलटण तालुक्यातील एका शाळेत हा प्रकार घडला आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन असा उल्लेख करण्याऐवजी विद्यार्थ्याऩे 'श्रीवल्ली' असा उल्लेख केला. त्याचा पेपर तपासताना शिक्षकाच्या लक्षात ही चूक आल्यानंतर त्यांनी संबंधित पालकांना आपल्या विद्यार्थ्यांची 'श्रीवल्ली' चूक दाखवून दिली. यावरुन पुष्पा चित्रपटाने तरुणांसोबत शाळकरी मुलांनाही भुरळ पाडल्याचे दिसत आहे.