नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 07:26 IST2025-12-31T07:25:31+5:302025-12-31T07:26:36+5:30
छ. संभाजीनगरात उमेदवारी न मिळाल्याने दोघांचा जाळून घेण्याचा प्रयत्न; नाशिकमध्ये भाजपच्या इच्छुकांनी आमदाराचा केला पाठलाग; फार्महाऊसचे गेट तोडले; राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी थेट नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहिली...

नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
छत्रपती संभाजीनगर : वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर मिरवला, सतरंज्या उचलल्या, पण उमेदवारी देताना डावलले गेल्याने निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक मंगळवारी राज्यात ठिकठिकाणी झाला. छत्रपती संभाजीनगरात तर नाराज इच्छुकांनी भाजप कार्यालयात तुफान राडा केला. नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहत काही जणांनी कमळ चिन्ह फेकून दिले, तर महिला उमेदवार व रिपाइं आठवले गटाबरोबर धोका केल्याचा आरोप करीत संतप्त कार्यकर्त्याने भाजप कार्यालयातच अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला.
नाराजांचे वादळ व नेत्यांची पळापळ असे चित्र दिवसभर भाजप कार्यालयात होते. अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर एकेक नेते कार्यालयात आले व त्यांनी बंडखोरी करणाऱ्यांची, नाराजांची समजूत काढायचा प्रयत्न केला. काहींनी बंडखोरी करीत अपक्ष, तर काहींनी मिळेल त्या पक्षांकडून अर्ज दाखल केला.
रिपाइं आठवले गटाचा ठिय्या
छत्रपती संभाजीनगरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) कार्यकर्त्यांनीही संतप्त होत भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात जाळून घेण्याचा प्रयत्न करीत ठिय्या दिला. भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवून एकाही प्रभागातून रिपाइंला उमेदवारी न दिल्याचा आरोप करत राकेश पंडित संजय ठोकळ आणि जयकिशन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला. यावेळी एका पदाधिकाऱ्याने अंगावर इंधन ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला.
नाशिक : आमदारांच्या वाहनाचा पाठलाग
भाजपचा एबी फॉर्म मिळविण्यासाठी इच्छुकांनी मंगळवारी थेट शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याच गाडीचा नाशिक-मुंबई महामार्गावर फिल्मी स्टाइल पाठलाग केला. यावेळी केदार यांच्यासोबत गाडीत आ. राहुल ढिकले आणि आ. सीमा हिरे याही होत्या. विल्होळीतील फार्महाऊसवर फॉर्म वाटप सुरू होते. इच्छुकांनी या फार्महाऊसवर मोठी गर्दी केली. त्यामुळे फार्महाऊसचे गेट बंद करण्यात आले. यामुळे संतप्त इच्छुकांनी गेट फोडून फार्महाऊसमध्ये प्रवेश केला.
शिव्या, घोषणाबाजी अन् रडारड -
छत्रपती संभाजीनगरात अण्णा भंडारी यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे नेत्यांना शिवीगाळ केली. सुवर्णा बताडे यांनीदेखील उमेदवारी न मिळाल्यामुळे अंगावर रॉकेल ओतून घेतले. तर भाजपच्या जुन्या कार्यकर्त्या संध्या कापसे यांनी नेत्यांना जाब विचारला.
उमेदवारी नाकारल्याने वर्षा साळुंके आणि शालिनी बुंदे यांचे डोळे पाणावले होते. तर लता दलाल यांनी दुसऱ्या पक्षातून उमेदवारी घेत भाजपलाच आव्हान दिले. पक्षात १५ दिवसांपूर्वी आलेल्यांना तिकीट मिळते, असा संताप दिव्या मराठे यांनी व्यक्त केला.