नेहरू-गांधींची काँग्रेस संपली; आता घर भरणारी काँग्रेस शिल्लक, शिवेंद्रराजे भोसले यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 17:55 IST2026-01-10T17:53:07+5:302026-01-10T17:55:48+5:30
महायुतीच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथे सभा

नेहरू-गांधींची काँग्रेस संपली; आता घर भरणारी काँग्रेस शिल्लक, शिवेंद्रराजे भोसले यांचा हल्लाबोल
इचलकरंजी : जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांची काँग्रेस संपली आहे. आताची जी काँग्रेस आहे, ती फक्त स्वत:चे घर आणि खिसे भरणारी काँग्रेस आहे. त्यांना फक्त सत्ता पाहिजे, पद पाहिजे. त्या माध्यमातून भ्रष्टाचार करायचा आणि आपलं घरदार भरायचं आणि जनतेला आहे त्या परिस्थितीत सोडून द्यायचं, अशी ही काँग्रेस आहे, असा आरोप सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केला.
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीनिमित्त महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. भोसले म्हणाले, विरोधकांकडे आरोप करण्यापलीकडे काहीच नाही. राज्य सरकारने आणलेल्या लाडक्या बहीण योजनेलाही ते नावे ठेवत होते. त्या योजनेला न्यायालयात धाव घेऊन विरोध केला.
तेथूनही काही साध्य झाले नाही म्हणून निवडणुकीपुरती योजना आहे. नंतर बंद करतील, असा कांगावा केला; परंतु आज सरकार स्थापन होऊन वर्ष होऊन गेले तरी अखंडितपणे लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि पुढेही सुरूच राहील. आमदार राहुल आवाडे, शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, राहुल घाट, श्वेता मालवणकर, रूपा बुगड, उदय बुगड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
वाचा: विरोधकांकडे विकासाचे नियोजन नाही - हाळवणकर; इचलकरंजीत महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध
ठाकरे बंधू स्वार्थासाठी एकत्र आले
राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले. मुळात ते स्वार्थासाठी, सत्तेसाठी वेगळे झाले होते आणि आता भाजपच्या विचारापुढे आपण वेगळे राहून लढू शकत नाही. आपण पूर्ण नामशेष होऊ. म्हणून ते पुन्हा स्वत:च्या स्वार्थासाठीच एकत्र आले आहेत. याच्यामध्ये मुंबईकरांचा, महाराष्टाचा, मराठी माणसाचा आणि राज्यातील जनतेचा काहीही फायदा किंवा हित नाही, असा टोला मंत्री भोसले यांनी लगावला.