सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 15:05 IST2024-11-24T15:04:55+5:302024-11-24T15:05:15+5:30
NCP Ajit Pawar: येत्या एक-दोन दिवसांत नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल.

सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
NCP Ajit Pawar: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. महायुतीने या निवडणुकीत पहिल्यांदाच 235 पेक्षा जास्त जागांवर यश मिळवले. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. आता या निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांची सर्वानुमते पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली आहे.
निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार असून, येत्या एक-दोन दिवसांत सरकारचा शपथविधी सोहळाही पार पडणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निकालानंतर अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरच्या झालेल्या बैठकीत अजित पवारांची गटनेतेपदी निवड झाली आहे.
आज शिंदेसेनेचा गटनेता ठरणार
शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुंबईत यायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलमध्ये या सर्व आमदारांना ठेवले आहे. सध्या या हॉटेलमध्ये पक्षाचे बहुतांश आमदार उपस्थित आहे. उर्वरित आमदार आज संध्याकाळपर्यंत पोहोचतील. सर्वजण आल्यानंतर शिंदे गटाची बैठक होईल. या बैठकीत गटनेता निवडण्यात येईल. शिंदेसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड निश्चित मानली जात आहे.
महायुतीचा सर्वात मोठा विजय
यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा इतिहासात नोंद होणार आहे. राज्यभरात महायुतीच्या विरोधात वातावरण असताना, महायुतीमध्ये सर्वात मोठा विजय मिळवला आहे. भाजपचे 132, शिवसेनेचे 57, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार विजयी झाले आहेत. बहुतांश ठिकाणी शिवसेना vs शिवसेना, राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी आणि भाजप vs काँग्रेस, अशी लढत होती. या लढतीत महायुतीने विरोधकांचा दारुण पराभव केला. तर दुसरीकडे सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीला 50 चा आकडाही गाठता आला नाही.