मविआचा शपथविधीवर बहिष्कार, आज घेणार शपथ; पुण्याचे हेमंत रासने विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 05:58 IST2024-12-08T05:57:44+5:302024-12-08T05:58:40+5:30

Maharashtra MLA Oath : मविआतील समन्वयाच्या अभावामुळे मित्रपक्षांनी घेतली शपथ

MVA boycotts swearing-in ceremony, will take oath today;  A protest was held on the steps of the Vidhan Bhavan over the issue of EVMs | मविआचा शपथविधीवर बहिष्कार, आज घेणार शपथ; पुण्याचे हेमंत रासने विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसले

मविआचा शपथविधीवर बहिष्कार, आज घेणार शपथ; पुण्याचे हेमंत रासने विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसले

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई :  नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या शनिवारी पहिल्याच दिवशी मविआने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत शपथविधीवर बहिष्कार टाकला. मात्र, त्यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून आला, ते आता रविवारी शपथ घेणार आहेत.

सकाळी ११ वाजता शपथविधी सुरू झाला तेव्हा उद्धव सेनेचे आणि शरद पवार गटाचे आमदार विधानसभेत हजर होते. मात्र १० मिनिटांतच त्यांना काँग्रेसकडून शपथविधी न घेता विधानसभेबाहेर पडण्याचा निरोप आला. शपथविधी सुरू असताना नाना पटोले यांचे नाव शपथविधीसाठी पुकारण्यात आले. मात्र, पटोले सभागृहात नव्हते, नेमका त्याच वेळी मारकडवाडीत ग्रामस्थांना मतदान घेऊ न देण्याचा प्रशासनाचा निर्णय, वाढीव मतदान आणि ईव्हीएमच्या मुद्यावर मविआचा एकही आमदार शपथ घेणार नाही, असा निरोप आमदारांना मिळाला. त्यानंतर उद्धव सेनेचे आणि शरद पवार गटाचे आमदार सभात्याग करून बाहेर पडले. त्यानंतर मविआची बैठक झाली. त्यात निषेध म्हणून कुठल्याच आमदाराने शपथ घ्यायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. 

काँग्रेसमध्ये गोंधळ
कामकाज सुरू होण्यापूर्वी उद्धव सेनेचे आणि शरद पवार गटाचे सर्व आमदार विधानभवनात पोहचले होते. मात्र, काँग्रेसचे थोडेच आमदार विधानभवनात आले होते, तर काही आमदार वडेट्टीवार यांच्या घरी होते.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय करायचे याबाबत सूचना केल्या नव्हत्या. शपथविधी सुरू झाल्यानंतर पटोले यांनी फोन करून शपथ न घेण्याबाबत आमदारांना निरोप दिला.
पटोले यांच्या या गोंधळामुळे काँग्रेसबरोबरच उद्धव सेना आणि शरद पवार गटातही प्रचंड नाराजी होती. 
या गोंधळामुळे निरोप वेळेवर न मिळाल्याने मविआचे घटक असलेल्या सपाचे अबू आझमी, रईस शेख आणि माकपच्या विनोद निकोल यांनी शपथ घेतली.

यानी घेतली शपथ
धानसभेचे माजी अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार, डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गणेश नाईक, हसन मुश्रीफ, बबनराव लोणीकर, संजय कुटे, सुरेश खाडे, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, संजय राठोड, उदय सामंत, धर्मरावबाबा आत्राम, संभाजी पाटील निलंगेकर, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, रवींद्र चव्हाण, राजकुमार बडोले, आशिष शेलार, अतुल सावे, चंद्रकांत पाटील, धनंजय मुंढे, आदिती तटकरे, सुलभा खोडके, मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, देवयानी फरांदे, मोनिका राजळे यांच्यासह १७३ जणांनी शपथ घेतली.

हेमंत रासने जागा चुकले
पुण्यातील कसबा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे हेमंत रासने विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसले. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आली. त्यांनी शपथ घेतल्यानंतर रासने यांना हाताला धरून सत्ताधारी बाकावर बसवले. 

कुटुंबातील चौथ्या आमदार
श्रीजया चव्हाण या चव्हाण कुटुंबातील चौथ्या आमदार असून त्या नांदेड जिल्ह्यातील भोकर येथून निवडून आल्या आहेत. त्यांनी शपथ घेताना आजोबा माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांचे महाराष्ट्राचे भगिरथ म्हणून आवर्जून स्मरण केले. 

महायुतीचे सरकार हे जनतेचे सरकार नाही. मतांची चोरी करून आलेल्या या सरकारने शपथविधी सोहळ्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. त्यामुळे जनभावनेचा आदर करत मविआच्या सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतला. 
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस 

 निकालानंतर राज्यात कुठेही जनतेचा जल्लोष पाहायला मिळाला नाही. मग प्रश्न हाच पडतो की हे जनतेने दिलेले बहुमत आहे की, ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाने दिलेले बहुमत आहे? मारकडवाडीतील लोकांनी चाचणी मतदान मागितले तेव्हा ते होऊ दिले नाही. त्यामुळे आम्ही  जनतेचा मान राखून आज शपथ घेणार नाही. 
- आदित्य ठाकरे,  उद्धव सेना नेते

मारकडवाडीने मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. यात निवडणूक आयोगाचा काय संबंध आहे? पोलिसांचा काय संबंध आहे? गावाने एखादा निर्णय घेतला तरी राज्य  सरकार त्यावर  वरवंटा फिरवण्याचे  काम करत आहे. 
- जितेंद्र आव्हाड, शरद पवार गट
 

Web Title: MVA boycotts swearing-in ceremony, will take oath today;  A protest was held on the steps of the Vidhan Bhavan over the issue of EVMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.