'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:30 IST2026-01-13T17:29:46+5:302026-01-13T17:30:45+5:30
Municipal Election News: भारतीय जनता पक्ष आणि असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष हे धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राजकीय स्वार्थ साधत आहेत. हिंदू-मुस्लीम, मराठा-ओबीसी वाद निर्माण करून जनतेची माथी भडकवतात आणि सत्तेसाठी मात्र एकत्र येतात, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली।

'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
चंद्रपूर/मुंबई - भारतीय जनता पक्ष आणि असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष हे धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राजकीय स्वार्थ साधत आहेत. हिंदू-मुस्लीम, मराठा-ओबीसी वाद निर्माण करून जनतेची माथी भडकवतात आणि सत्तेसाठी मात्र एकत्र येतात. हिरव्या पतंगाचा मांजा भगवा आहे तर धनुष्याचा बाण हिरवा आहे. या ढोंगी भाजपा, शिंदेसेना व एमआयएमला महानगरपालिका निवडणुकीत धडा शिकवा व काँग्रेसला बहुमताने विजयी करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व ओवैसी यांचा एमआयएम पक्ष दोघेही हिंदू मुस्लीमच्या नावावर लोकांमध्ये दहशत माजवत आहेत पण सत्तेची मलई खाण्यासाठी मात्र एकत्र येतात हे दिसून आले आहे. अकोट मध्ये भाजपा व एमआयएम सत्तेसाठी एक झाले. एमआयएमशी युती कधीच करणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छाती ठोकून सांगतात पण अकोटमधील युती काही तोडत नाहीत व त्यांच्यावर कारवाईही करत नाहीत, कारण हे दोन्ही पक्ष एकच आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, या सत्तेच्या साठमारीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही मागे नाही, त्यांनीही बीड जिल्ह्यात परळी नगरपालिकेत एमआयएमचा हात हाती घेतला. जनतेमध्ये दहशत माजवून सत्तेसाठी गळ्यात गळे घालणाऱ्या या ढोंगी लोकांना आता धडा शिकवा, असे आवाहन करताना सपकाळ म्हणाले की, "तू इधर उधर की न बात कर, मुझे रहज़नों से गिला तो है, पर तेरी रहबरी का सवाल है", अशी टीकाही सपकाळ यांनी केली.