‘भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, मनपा निवडणुकीत ही विषवल्ली कापा’, काँग्रेसचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:01 IST2026-01-14T14:00:10+5:302026-01-14T14:01:17+5:30
Municipal Election News:भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत गढूळ करून ठेवले आहे. महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेल्या निवडणूक कूनीतीची फळं आज महाराष्ट्र भोगतोय, हे राज्यातील जनतेने लक्षात घ्यावे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

‘भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, मनपा निवडणुकीत ही विषवल्ली कापा’, काँग्रेसचं आवाहन
मुंबई - भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत गढूळ करून ठेवले आहे. महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेल्या निवडणूक कूनीतीची फळं आज महाराष्ट्र भोगतोय, हे राज्यातील जनतेने लक्षात घ्यावे. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाने जन्माला घातलेली विषवल्ली महाराष्ट्राच्या जागरूक जनतेने ओळखावी आणि ही विषवल्ली आता कापल्याशिवाय शांत बसू नका, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नांदेड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पतीवर अज्ञात व्यक्तींनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. सोलापूरात एका उमेदवाराचा खून झाला, अकोट आणि खालापूरमध्ये खून झाले. राज्यातील अनेक उमेदवारांना धमक्या देण्यात आल्या, त्यांच्या कुटुंबीयांना धमकावण्यात आले, त्याचीच प्रचिती नांदेडमध्येही आली. विशेष म्हणजे हे सगळे उमेदवार विरोधी पक्षातीलच आहेत, जे आज सत्तेत बसलेल्या गुंड, मवाल्यांच्या भ्रष्टयुतीला भिडण्याची हिंमत दाखवताहेत. ते लढताहेत हीच त्यांची चूक आहे का? याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे, असे सपकाळ म्हणाले.
नगरपालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास व्यक्त करत राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवले. ४१ नगराध्यक्ष व १००६ नगरसेवक निवडून दिले, २००० ठिकाणी दुसऱ्या नंबरवर आले. या निवडणुकीत कोणत्याही अमिषाला बळी न पडता लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी मतदान करा, असे आवाहनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केले.