प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 05:28 IST2026-01-07T05:26:10+5:302026-01-07T05:28:02+5:30
देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार : तुम्हाला मिरची लागली तर मी काय करू? मागची पाने पलटली तर अजित पवारांना बोलता येणार नाही : बावनकुळे

प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली
लोकमत न्यूज नेटवर्क, धुळे/मुंबई/ पिंपरी (पुणे) : महापालिका निवडणुकीत एकीकडे बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांचा मुद्दा तापला असतानाच आता प्रचारात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशा जुंपली आहे. भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 'मागील पानांची' आठवण करून दिली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर बिनविरोध निवडीवरून पलटवार केला.
देशाच्या संसदीय इतिहासात ३५ खासदार बिनविरोध निवडून आले आहेत, त्यापैकी ३३ खासदार एकट्या काँग्रेसच्या काळातील आहेत. जेव्हा काँग्रेसचे खासदार बिनविरोध येतात, तेव्हा लोकशाही जिवंत असते; पण धुळ्यात भाजपचे चार नगरसेवक निवडून आले तर लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचे डोकं नेमकं कुठे आहे, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
फडणवीस यांची पांझरा काठी सभा झाली. त्यावेळी त्यांनी बिनविरोधच्या मुद्द्यावरून विरोधकांवर पलटवार केला. निवडणूक आयोग भाजपच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप उद्धवसेना करीत आहे. यावर फडणवीस म्हणाले पराभवाच्या भीतीने विरोधक निराधार आरोप करत आहेत. ‘अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूँ...’ या गाण्याचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांच्या टीकेची खिल्ली उडवली.
कुणाच्या शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय : फडणवीस
नागपूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर भूमिका मांडली. कुणी कितीही शिव्या दिल्या तरी माझ्यावर परिणाम होत नाही. मला विष प्यायची सवय आहे. सपकाळ यांना त्यांच्या पक्षात, जिल्ह्यात व तालुक्यातही कुणी गंभीरतेने घेत नाही. केवळ मला शिव्या दिल्याने ते प्रसारमाध्यमांत दिसतात असे ते म्हणाले.
आम्ही मागची पाने चाळली तर अजित पवारांना बोलता येणार नाही
पिंपरी-चिंचवडमध्ये ते अनेक वर्षे सत्तेत होते. मागची पाने पलटायची आमची इच्छा नाही; पण तसे झाले तर बोलण्यासारखे बरेच काही आहे. आम्ही मागची पाने चाळली तर अजित पवारांना बोलता येणार नाही, असा टोला भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. ७० हजार कोटींच्या कथित घोटाळ्याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असून, त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही, अशी आठवणही त्यांनी करून दिली. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी बावनकुळे मंगळवारी आले होते.
निकाल आल्यावर पुढची भूमिका ठरेल...
अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत, ‘माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, हे सगळ्यांना माहिती आहे; पण ज्यांनी हे आरोप केले, त्यांच्यासोबतच मी आज सरकारमध्ये बसलो आहे,’ असा युक्तिवाद केला होता. त्यावर बावनकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे काही अभिमानास्पद नाही. प्रकरण न्यायालयात आहे, निकाल आल्यावर पुढची भूमिका ठरेल.
मी फक्त महापालिकेच्या कारभाराबाबतच बोललो !
महायुती म्हणून आम्ही राज्यात आणि केंद्रात एकत्र आहोत. मात्र महापालिका निवडणूक आम्ही स्वतंत्र लढत आहोत. त्यामुळे चर्चा फक्त स्थानिक कारभारापुरतीच असली पाहिजे. मी फक्त पालिकेच्या कारभाराबद्दल बोललो आहे. त्याचे पुरावेही दिले आहेत. इतर कोणतेही आरोप केलेले नाहीत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
राष्ट्रवादीला सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. विरोधात गेलात तर तुमच्या विरोधात आम्ही काम करू, असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला.