उद्धव ठाकरे परभणी, बीड दौऱ्यावर जाणार; सोमनाथ सूर्यवंशी अन् संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 13:17 IST2024-12-28T13:14:11+5:302024-12-28T13:17:04+5:30
Shiv Sena UBT Group News: खरे गुन्हेगार मंत्रिमंडळात आणि सरकारमध्ये आहेत, अशी लोकांची भावना आहे. हे सरकार खऱ्या गुन्हेगारांना वाचवत आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे परभणी, बीड दौऱ्यावर जाणार; सोमनाथ सूर्यवंशी अन् संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेणार
Shiv Sena UBT Group News: राज्यभर गाजलेले सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण अन् हत्या प्रकरण आणि मस्साजोगशी संबंधित सर्व गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे गेला आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्यामुळे हे प्रकरण राज्यात गाजले. यानंतर महाविकास आघाडीसह विरोधकांनी या प्रकरणी महायुती सरकारवर हल्लाबोल केला असून, मनोज जरांगेंपासून ते अंजली दमानिया यांच्यापर्यंत अनेक जण बीडमध्ये भेटी देत आहेत. तसेच मोर्चेही काढले जात आहेत. बीड प्रकरणासोबतच परभणी येथील प्रकरणी गाजत आहे. काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणी येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली होती. या दोन्ही प्रकरणावरून विरोधक महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान आणि त्यानंतर झालेल्या आंदोलनातील हिंसक प्रकार याची न्यायालयीन चौकशी करण्याची तसेच या प्रकरणातील वादग्रस्त पोलिस अधिकारी अशोक घोरबांड यांच्या निलंबनाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावरूनही विरोधक आक्रमक झाले असून, महायुती सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. यातच आता उद्धव ठाकरे परभणी आणि बीड दौऱ्यावर जाणार असून, सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेट देणार असल्याची माहिती मिळाली आहे.
उद्धव ठाकरे सोमनाथ सूर्यवंशी अन् संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेणार
खरे गुन्हेगार मंत्रिमंडळात आणि सरकारमध्ये आहेत, अशी लोकांची भावना आहे. या मोर्चामध्ये अनेक मोठ्या नेते सहभागी होतील. शिवसेनेतर्फे आमचे संभाजीनगरचे सगळे प्रमुख नेते आहेत. ते यात सहभागी होतील. जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी आणि बीड येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच बीडमधील मोर्चा झाला. राष्ट्रीय स्वरूप नाही. सर्वच पक्षाचे लोक बीडमधील जनता बीडमधील दहशतवाद संपवण्यासाठी किंवा संतोष देशमुखचे खरे आरोपी पकडावे आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून हा मोर्चा आहे. हे सरकार खऱ्या गुन्हेगारांना वाचवत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, भाजप ॲक्शन मोडमध्ये म्हणजे काय, ईव्हीएम ताब्यात घेणे पैसे जमा करणे, पैसे कुठे वाटत आहे ते पाहणे ही त्यांची एक्शन मोड असते. मुंबई महानगरपालिका निवडणूक असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, लोकसभेच्या निवडणुका असतील, आमची ताकद आमचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांना विकत घेणारी नवी जमात जर राजकारणात, महाराष्ट्रात वाढत असेल, तर नुकसान महाराष्ट्राच आहे आणि संपूर्ण आपल्या मराठी अस्मितेचे आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.