'शरद पवारांना संपवायला मोदी-शहांना 10 जन्म घ्यावे लागतील'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 20:10 IST2019-10-16T20:10:40+5:302019-10-16T20:10:48+5:30
कर्जत-जामखेडमध्ये मुंडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीसांसह तेथील भाजपाचे उमेदवार राम शिंदेंवरही टीकेची झोड उठवली.

'शरद पवारांना संपवायला मोदी-शहांना 10 जन्म घ्यावे लागतील'
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसेच स्टार प्रचारक आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडें यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जबरी टीका केली. तसेच, प्रत्येक शेतकऱ्याला विहीर दिली, या वक्तव्यावरुन फडणवीसांची खिल्लीही उडवली. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघात धनंजय मुंडेंची प्रचारसभा पार पडली. या सभेत धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला.
कर्जत-जामखेडमध्ये मुंडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीसांसह तेथील भाजपाचे उमेदवार राम शिंदेंवरही टीकेची झोड उठवली. पवारसाहेब काय आहेत, हे कळण्यासाठी मोदी शहांना 10 जन्म घ्यावे लागतील, असे मुंडेंनी म्हटले. तसेच, ईडीची भीती दाखवून पवारांचं राजकारण संपावायचा प्रयत्न भाजपा सरकार करत आहे. मात्रस आमच्यासारखे लाखो तरुण राष्ट्रवादीत आहेत, तोपर्यंत राष्ट्रवादी संपणार नाही, असे मुंडेंनी म्हटलंय. पवारांनी जेवढी विमानतळं महाराष्ट्रात उभारली तेवढी, बसस्टँडही गुजरातमध्ये सुरू झालेली नाहीत, असे म्हणत पवारांना संपवायला मोदी-शहांना 10 जन्म घ्यावे लागतील, असे म्हणत धनंजय मुडेंनी भाजपावर सडकून टीका केली.
दरम्यान, सध्या निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून प्रचारात रंगत वाढली आहे. नेते अन् कार्यकर्त्यांसह प्रत्येकजण आपल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत गुंतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर बड्या नेत्यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. धनंजय मुंडे हे दिवसाला 4 ते 5 सभा घेऊन राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत.