Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 23:42 IST2026-01-02T23:39:45+5:302026-01-02T23:42:07+5:30
Mira-Bhayandar Municipal Election: मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत सर्वात जास्त भाजपात नाराजी उसळली आहे.

Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत सर्वात जास्त नाराजी भाजपात उसळली आहे. काही प्रमाणात भाजपा नेतृत्वास नाराजांना शांत करण्यात यश आले असले अनेक भाजपा माजी नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या बंडाचे निशाण फडकवत ठेवले आहे. विशेष म्हणजे अनेक प्रभागात भाजपच्या नाराजांनी स्वतःचे अपेक्षांचे पॅनल तयार केली आहेत.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत ११३ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ९५ जागांसाठी ४३५ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपात आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात टीका आणि आरोप करत अनेक ज्येष्ठ व जुन्या पदाधिकारी - माजी नगरसेवकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले होते.
आ. मेहता सह भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप जैन, माजी जिल्हाध्यक्ष ऍड. रवी व्यास सह स्थानिक नेतृत्वा पासून वरिष्ठ स्तरावरून देखील नाराजांची शांती करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. स्वतः. आ. मेहता हे काहीजणांच्या घरी जाऊन तर फोनवर व पक्ष कार्यालयात बोलावून नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. काहींनी फोन बंद करून टाकले होते तर काही जण घरी सापडले नाहीत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील शिवसेनेतील काही मोजक्या नाराजांचे मन वळवण्याचा प्रयत्न करताना भाजप आणि उद्धवसेनेच्या नाराजांना संपर्क करून आपल्या कडे वळवण्याचे प्रयत्न केले. आ. मेहतांनी देखील विरोधी पक्षातील नाराजांची चुचकारणी केल्याची चर्चा आहे.
भाजपाच्या प्रभाग २ मधून भाजपचे माजी नगरसेवक दाम्पत्य यशवंत व मीना कांगणे आणि भाजपचे शिखा भटेवडा व अभिषेक भटेवडा यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत भाजपा नाराजांचे पॅनल केले आहे. प्रभाग ४ मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका प्रभात पाटील, माजी नगरसेवक गणेश भोईर आणि प्रभात यांचा मुलगा पियुष यांनी माघार न घेता आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. प्रभाग ८ मध्ये भाजपाचे माजी नगरसेवक डॉ. सुशील अग्रवाल यांनी माघार घेतली तर काँग्रेसचे प्रवकळते प्रकाश नागणे यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे तर काँग्रेसच्या झीनत कुरेशी यांनी माघार घेतली.
प्रभाग ३ मध्ये भाजपच्या संजना गुर्जर मैदानात असून भाजपच्या रोहित गुप्ता, राजकुमार मिश्रा, महेंद्र गुर्जर आदींनी शरणागती पत्करली आहे. प्रभाग १ मधून भाजपचे सुनीता भोईर, प्रशांत केळकर तर शिंदेसेनेचे सोनू यादव यांनी माघार घेतली भोईर ह्या प्रभाग ५ मधून मैदानात आहेत. प्रभाग १ मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका रिटा शाह, ज्येष्ठ. भाजपा पदाधिकारी गौरांग कंसारा व भेरुलाल जैन यांनी बंडखोरी केली आहे.
प्रभाग ५ मध्ये उद्धवसेनेच्या विजय वाळुंज साठी मनसेचे स्वराज कासुर्डे यांनी माघार घेतली. येथून भाजपच्या माजी नगरसेविका प्रीती पाटील व सुनीता भोईर यांनी बंडखोरी करत दंड थोपटले आहेत. प्रभाग ६ मधून भाजपच्या बंडखोर शुभांगी कोटियन यांनी माघार घेण्यास नकार दिला. प्रभाग ७ मधून भाजपच्या माजी नगरसेविका दीपाली मोकाशी यांनी माघार घेतली असली तरी माजी भाजपा नगरसेविका रक्षा भूपतानी यांचे बंड नेत्यांना शमवता आले नाही.
प्रभाग २३ मधून भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी आगरी बाणा दाखवत उठाव केला आहे. मात्र येथून भाजपच्या जागृती म्हात्रे, मंदा शिंदे, रेशमा म्हामुणकर, शैलेश म्हामुणकर , अशोक पाटील आदी नाराजांनी नमते घेत माघार घेतली. प्रभाग १० मधून शिंदेसेने उद्धवसेनेचा उमेदवार आस्तिक म्हात्रे यांच्या पत्नीस प्रभाग ११ मधून उमेदवारी त्यामुळे आस्तिक यांनी माघार घेतली.
प्रभाग २० मधून भाजपाच्या श्रद्धा बने, चंद्रकांत मोदी, प्रकाश जैन यांनी तर उद्धवसेनेच्या उमा काकडे यांनी माघार घेतली. प्रभाग १३ मधून भाजपचे माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी माघार घेतली. प्रभाग १८ मधून भाजपच्या संजय दोंदे, रेणू मल्लाह, माजी नगरसेवक विजय राय यांनी माघार घेतली असली तरी भाजपचे माजी नगरसेवक दौलत गजरे मैदानात कायम आहेत. तर विजय राय यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.
प्रभाग १६ मधून भाजपचे संजय वर्तक, निलेश पाटील आदींनी माघार घेतली. प्रभाग १९ मधून भाजपच्या रंजना काथावटे यांची बंडखोरी कायम असून प्रभाग १४ मधून भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी व माजी नगरसेवक अनिल भोसले यांनी आपला नाराजीचा झेंडा फडकवत ठेवला आहे. २०१७ सालच्या निवडणुकीत देखील अगदी वरिष्ठानी आश्वास देऊन त्यांना माघार घ्यायला लावली होती. भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप जैन मात्र सांगितले की, पक्षातील जवळपास ९० टक्के लोकांनी माघार घेतली आहे.