निवडणूक प्रचाराचा बदलता ट्रेंड, 'डिजिटल क्रिएटर्स'ना सुगीचे दिवस, लाख रुपयांपर्यंत ऑफर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:11 IST2025-12-26T12:11:17+5:302025-12-26T12:11:32+5:30
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मतदारांच्या घरोघरी तर उमेदवार पोहोचतातच. पण सोशल मीडियाचा जमाना असल्याने बहुतांशी उमेदवारांनी हायटेक होत सोशल मीडियाद्वारे प्रचारावर भर दिला आहे.

निवडणूक प्रचाराचा बदलता ट्रेंड, 'डिजिटल क्रिएटर्स'ना सुगीचे दिवस, लाख रुपयांपर्यंत ऑफर!
धीरज परब,
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरा रोड: महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मतदारांच्या घरोघरी तर उमेदवार पोहोचतातच. पण सोशल मीडियाचा जमाना असल्याने बहुतांशी उमेदवारांनी हायटेक होत सोशल मीडियाद्वारे प्रचारावर भर दिला आहे. त्यासाठी डिजिटल क्रिएटर म्हणून त्यातील तज्ज्ञ मंडळींसह अगदी हौशा-नवशांनाही सुगीचे दिवस आले आहेत. या इच्छुक उमेदवारांकडून सोशल मीडिया सांभाळण्यासाठी अगदी २५ हजारांपासून लाखांचे पॅकेजही दिली जात आहेत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत आहे. अद्याप कोणत्याही पक्षाचे जागावाटप नक्की झालेले नाही.
मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे
एकीकडे कमी दिवस आणि दुसरीकडे मतदारांची संख्या एका एका प्रभागात ३०-४५ हजारांच्या घरात आहे. त्यामुळे मतदारांना प्रत्यक्ष जाऊन भेटणे अवघड होते. त्यात सोशल मीडियाचा जमाना आहे. अगदी लहान लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण हातातील मोबाइलद्वारे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. हेच लक्षात घेता इच्छुक उमेदवारांकडून सोशल मीडियाचा पुरेपूर उपयोग केला जात आहे.
२५ हजारांपासून ते १ लाखापर्यंतचे पॅकेज
व्हॉट्स अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स हॅन्डल ह्या सोशल मीडिया हँडलिंगसाठी २५ हजारांपासून १ लाख व त्यापेक्षा जास्त शुल्क आकारणी केली जात आहे. अनेकांचे तर कायमस्वरूपी डिजिटल मार्केटिंग करणारे नेमलेले आहेत.
विविध शुल्क आकारतात
निवडणूक काळात पक्ष आणि जवळपास सर्वच उमेदवार हे डिजिटल प्रचार करण्याच्या स्पर्धेत लागलेले आहेत. सोशल मीडिया हँडलिंग करणाऱ्यांना त्यांच्याकडून काम दिले जात आहे. त्याचे शिक्षण व अनुभव असो की नसो अनेकांनी आधी पासूनच आपले पॅकेज देणे सुरु केले. त्यामध्ये तुमच्या विविध पोस्ट डिझाईन करणे, रिल्स बनवणे, तुमच्या प्रभागातील भेटीगाठी, कामे, चौकसभा यांचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करणे, अशी कामे प्राथमिक पॅकेजमध्ये केली जात आहेत. रिल्सना जास्त मागणी आहे. पोस्ट ह्या बूस्ट करायच्या असतील वा पेड पोस्टसाठी वेगळे शुल्क आकारले जात आहे. उमेदवारांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी वेगळे पॅकेज शुल्क आकारले जात आहे.
अनेक कामांचा समावेश
उमेदवारांच्या प्रभागाचा अभ्यास करून प्रचाराची रणनीती ठरवणे, विविध कल्पना देणे, सल्ला देणे, मतदारांनुसार कोणते कार्यक्रम आयोजिणे, प्रचारात व भाषणातील मुद्दे लिहून देणे ही कामेसुद्धा रणनीतीकार करून देत आहेत.
"उमेदवार आणि राजकीय पक्षांना सोशल मीडियाद्वारे नियोजनबद्ध प्रचार करून लोकांपर्यंत पोहचता येते. डिजिटल प्रचार व मार्केटिंगची मागणी निवडणूक काळात मोठी आहे. ज्यांचे ह्या क्षेत्रात योग्य शिक्षण व अनुभव नाही ते देखील मोठ्या संख्येने डिजिटल क्रिएटर म्हणून निवडणुकीत सक्रिय आहेत. डिजिटल प्रचारातून अनेक तरुणांना रोजगाराची संधी मिळत आहे"
-दर्शन भाटकर, सोशल मीडिया हॅण्डलर, रणनीतीकार, डिजिटल मार्केटिंग