मारकडवाडी ग्रामस्थ आक्रमक; ईव्हीएमच्या बाजूने घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 08:58 IST2024-12-09T08:57:40+5:302024-12-09T08:58:09+5:30
बाहेरचे लोक उपद्व्याप करत असल्याचा आरोप

मारकडवाडी ग्रामस्थ आक्रमक; ईव्हीएमच्या बाजूने घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
नातेपुते (जि. सोलापूर) : मारकडवाडी येथे सभा घेऊन शरद पवार मागे फिरताच काही ग्रामस्थ आक्रमक झाले. गावात एकत्र येऊन राम सातपुतेंच्या समर्थनार्थ आणि ईव्हीएमच्या बाजूने घोषणा दिल्या. ‘जय श्रीराम’च्याही घोषणा दिल्या.
मारकडवाडी येथे मागील पाच वर्षांत केलेल्या कामांचे यादीसह फलक लावण्यात आले होते. सातपुते यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या निवडीबद्दल स्वागताचा बॅनर पवारांच्या सभेच्या ठिकाणी लावला होता. तो बॅनर पवारांना दिसू नये म्हणून त्या बॅनरच्या आडवा बॅनर जानकर समर्थकांनी लावल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, नंतर आडवा लावलेला बॅनर काढण्यात आला.
यावेळी पांडुरंग चोपडे व अजिंक्य मारकड म्हणाले, जानकरांनी शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. गावपुढाऱ्यांनी पैसे आणले पण होते, पण तरीही जानकरांना मारकडवाडीत अपेक्षित मतदान झाले नाही. कधीही निवडणूक घ्या, मारकडवाडी गाव विकासाच्या मागे उभे आहे. गावातील चार पुढारी एकत्र येऊन हा स्टंट चालू आहे. पवारांच्या सभेवेळी बाहेरचा पुढारी दमदाटी करत असल्याचे मारकडवाडीतील ग्रामस्थांनी सांगितले.
मारकडवाडी येथील जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास सहन करणार नाही. मोहिते-पाटील आणि जानकरांचे चॅलेंज स्वीकारतो. कधीही निवडणूक लावावी. निवडणूक प्रशासनाने घ्यावी. कार्यकर्त्यांनी नव्हे, असे माजी आमदार राम सातपुते म्हणाले.
शरद पवारांनी पराभव मान्य करावा : मुख्यमंत्री फडणवीस
शिरूर (जि. पुणे) : विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी जनतेच्या कौल मान्य करत पराभव स्वीकारावा, कार्यकर्ते व खोटे सांगणारे नेत्यांचे ऐकू नये अन्यथा लोकशाही प्रक्रियेवारील लोकांचा विश्वास उडेल. अशी कार्यवाही किमान शरद पवारांनी करू नये. शरद पवार हे ५० वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत. अशा नेत्यांनी संयमाने वागायचे असते आणि पराभव स्वीकारायचा असतो, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांना दिला.