"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 21:12 IST2024-10-12T21:11:10+5:302024-10-12T21:12:51+5:30
Eknath Shinde Dasara Melava: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यामधून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांच्या दाढीवरून टीकाटिप्पणी करणाऱ्या विरोधकांना एकनाथ शिंदे यांनी रामदास आठवलेस्टाईल चारोळी सुनावून टोला लगावला.

"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यामधून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांच्या दाढीवरून टीकाटिप्पणी करणाऱ्या विरोधकांना एकनाथ शिंदे यांनी रामदास आठवलेस्टाईल चारोळी सुनावून टोला लगावला. ‘’होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, अशी टिप्पणी एकनाथ शिंदे यांनी केली.
एकनाथ शिंदे दाढीवरून टीकाटिप्पणी करणाऱ्या विरोधकांना टोला लगावताना म्हणाले की, माझी दाढी त्यांना खुपते. सारखं दाढीवर बोलतात. पण मी सांगतो, होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी. महाराष्ट्राच्या विकासाची धावू लागली गाडी, ही दाढीची करामत आहे. म्हणून मला हलक्यात घेऊ नका हे परत एकदा सांगतो, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील अनेक रखडलेले प्रकल्प आम्ही पूर्ण केले. मुंबईच्या रस्त्यांच्या कामात तुम्ही पैसे खाल्ले, डांबरात पैसे खाल्ले, नाल्याच्या कामात पैसै खाल्ले. भ्रष्टाचाराचे अड्डे बंद केल्याने आता तुम्हाला मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत, असं आश्वासनही शिंदे यांनी दिलं.
दरम्यान, या दसरा मेळाव्यामधून एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गट आणि विरोधकांनाही यांनी इशारा दिला, ते म्हणाले की, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आनंद दिघेंचा चेला आहे. असा स्वस्तात जाणारा नाही. मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळणारा नाही. तर पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक मैदानही सोडत नाही आणि विचारही सोडत नाहीत. म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निघालो. आज हा एकनाथ शिंदे महाराष्ट्रात जिथे जिथे जातो, तिथे सगळे जण हसत स्वागत करतात. आशीर्वाद देतात, हेच आपण कमावलं आहे. दोन वर्षांच्या अगदी कमी काळात आपलं सरकार लाडकं सरकार झालं आहे, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला.