सांगली निवडणूक निकालः राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार विजयी, सुमनताई पाटील विधानसभेची परीक्षा पास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 12:46 IST2019-10-24T11:43:31+5:302019-10-24T12:46:28+5:30
Sangli Vidhan Sabha 2019 Result: आर.आर. पाटील(आबा) यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी तासगाव-कवठे महंकाळ मतदारसंघातून विजय मिळवल्याची प्राथमिक माहिती आहे.

सांगली निवडणूक निकालः राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार विजयी, सुमनताई पाटील विधानसभेची परीक्षा पास
सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या विजयी उमेदवार म्हणून तासगाव-कवठे महंकाळ मतदारसंघातून सुमन पाटील यांच्या नावाची घोषणा होत आहे. राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून आणि मतदारसंघात सुमनताई पाटील विजयी झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या विजयी उमेदवार म्हणून त्यांच नाव चर्चेत आलं आहे. पहिल्या फेरीपासूनच सुमन पाटील यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरात सुमनताई पाटील यांना 9123 मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या अजितराव घोरपडे यांना 3535 मिळाली होती.
आर.आर. पाटील(आबा) यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी तासगाव-कवठे महंकाळ मतदारसंघातून विजय मिळवल्याची प्राथमिक माहिती आहे. आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर सुमनाताई पाटील यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र, आबांच्या सहानुभूतीचा हा परिणाम असल्याचं त्यावेळी सांगण्यात येत होतं. त्यामुळे, यंदाची ही निवडणूक सुमनताई पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठा आणि परीक्षा असल्याचे सांगण्यात येत होते. या परीक्षेत सुमन पाटील यांनी पास होऊन दाखवले आहे.
आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी यंदाच्या निवडणूक प्रचारात सक्रीय सहभाग घेतला होता. रोहित यांच्या रुपात अनेकांना आबाचा भास होत. त्यामुळे रोहित यांच्या साधेपणाचा आणि भाषणाचा प्रभाव मतदारसंघातील प्रचारात जाणवला आहे. सुमन पाटील यांनी विजय मिळवत घोरपडे यांचा पराभव केला आहे.