चाैघींचा संघर्ष; दाेघींना संधी, पण ‘पिक्चर अभी बाकी है...’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 09:58 AM2024-04-05T09:58:59+5:302024-04-05T10:00:50+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: भावना गवळी, नवनीत राणा, प्रतिभा धानोरकर आणि रश्मी बर्वे या विदर्भातील लोकसभा निवडणूक रणांगणातील रणरागिणी. चौघींचा पक्ष वेगळा, कर्मभूमी वेगळी, पण संघर्ष हा समान दुवा. उमेदवारी मिळवण्याचा चौघींचाही संघर्ष गाजला.

Maharashtra Lok Sabha Election 2024: The struggle of all four; Chances for both, but 'Picture Abhi Baqi Hai...' | चाैघींचा संघर्ष; दाेघींना संधी, पण ‘पिक्चर अभी बाकी है...’

चाैघींचा संघर्ष; दाेघींना संधी, पण ‘पिक्चर अभी बाकी है...’

- राजेश शेगाेकार
नागपूर - भावना गवळी, नवनीत राणा, प्रतिभा धानोरकर आणि रश्मी बर्वे या विदर्भातील लोकसभा निवडणूक रणांगणातील रणरागिणी. चौघींचा पक्ष वेगळा, कर्मभूमी वेगळी, पण संघर्ष हा समान दुवा. उमेदवारी मिळवण्याचा चौघींचाही संघर्ष गाजला. गवळींना पक्षाने तर बर्वेंना जात प्रमाणपत्राने उमेदवारीपासून दूर ठेवले. राणा व धानोरकर यांनी उमेदवारीची पक्षीय लढाई जिंकली, मात्र चारचौघींचा संघर्ष अजून संपलेला नाही. 

पक्षांतर्गत ऐक्याचे आव्हान 
संपूर्ण राज्यात काँग्रेसला विजय देणाऱ्या चंद्रपूर या एकमेव मतदारसंघाचे खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचा उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात संघर्ष उभा ठाकला, अखेर धानोरकर यांनी बाजी मारली.
तत्पूर्वी आरोप-प्रत्यारोपांची पातळी कौटुंबिक स्तरावर पोहोचल्याने काँग्रेसमधील दोन गटांत दरी रुंदावली. हा दुरावा कमी करतानाच भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

उमेदवारी रद्द झाल्याने आल्या चर्चेत 
- रश्मी बर्वे यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली अन् थेट अध्यक्ष झाल्या. नागपूर जिल्ह्याबाहेर त्यांचे नावही कधी चर्चेत नव्हते. पण रामटेक मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी दिली अन् छाननीच्याच दिवशी जातप्रमाणपत्राच्या मुद्द्यावर त्यांची उमेदवारी बाद झाली. यामुळे बर्वे राज्यभर चर्चेत आल्या.
- पक्षांतर्गत विरोध आणि ऐनवेळी आलेला जातप्रमाणपत्राचा मुद्दा यामुळे बर्वे यांच्या अडचणीत भर पडली व त्यांची उमेदवारी रद्द झाली. आता रामटेकमध्ये त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार असून त्यांच्या त्या स्टार प्रचारक आहेत.

अंतर्गत असंतोषाला कसे जाणार सामोरे?
- नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार असल्या तरी मुळात सिनेअभिनेत्री असल्याने त्यांची चर्चा देशभर असते. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या भूमिका स्थानिक स्तरावर वादाच्या ठरल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी देऊ नये म्हणून अमरावतीमधील भाजप, शिंदेसेना आणि बच्चू कडू यांचा विरोध होता, मात्र हा विरोध भाजपने डावलला. 
-राणांनी उमेदवारीची पहिली लढाई जिंकली, पाठोपाठ जातप्रमाणपत्राची दुसरी लढाईही जिंकली. पण आता प्रहारचा उमेदवार, शिंदेसेनेसह अडसुळ पिता-पुत्रांची नाराजी, भाजप निष्ठावंतांमधील असंतोष यांचा सामना करत एकसंघ काँग्रेसला सामोरे जाण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

तिकीट कापले, पुढे काय?
यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून पाच वेळा लोकसभेत पोहोचण्याचा विक्रम करणाऱ्या भावना गवळी या विदर्भातील एकमेव महिला खासदार. ‘अँटी इन्कम्बसी’ व भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भाजपने उमेदवार बदलण्याची शिंदेसेनेला गळ घातली. ती मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली. 
१ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरून निघतानाच त्यांचा मावळलेला उत्साह उमेदवारी कापली गेल्याचे संकेत देणारा होता. आता त्या कोणती भूमिका निभावतात यावर त्यांचे राजकीय भविष्य ठरणार आहे.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: The struggle of all four; Chances for both, but 'Picture Abhi Baqi Hai...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.