हेमंत पाटलांचे दिलेले तिकीट कापले, भावना गवळींचाही पत्ता कट, शिंदेसेनेत नाट्यपूर्ण घडामोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 07:12 AM2024-04-04T07:12:23+5:302024-04-04T07:13:35+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: शिंदेसेनेत उमेदवारीवरून बुधवारी नाट्यपूर्ण घटना घडल्या. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचे हिंगोलीतून दिलेले तिकीट कापले, तर पाचवेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांचा पत्ता यवतमाळ-वाशिममधून कट करण्यात आला.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Hemant Patal's ticket cut, Bhavana Gawli's address also cut, dramatic developments in Shindesena | हेमंत पाटलांचे दिलेले तिकीट कापले, भावना गवळींचाही पत्ता कट, शिंदेसेनेत नाट्यपूर्ण घडामोडी

हेमंत पाटलांचे दिलेले तिकीट कापले, भावना गवळींचाही पत्ता कट, शिंदेसेनेत नाट्यपूर्ण घडामोडी

मुंबई - शिंदेसेनेत उमेदवारीवरून बुधवारी नाट्यपूर्ण घटना घडल्या. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचे हिंगोलीतून दिलेले तिकीट कापले, तर पाचवेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांचा पत्ता यवतमाळ-वाशिममधून कट करण्यात आला. त्यांच्या  जागी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून  उमेदवारी देण्यात आली. हिंगोलीत बाबूराव कदम कोहळीकर यांना तिकीट दिले असून ते गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी नावे जाहीर करण्यात आली नाहीत, असे समजते.

हेमंत पाटील यांच्या जाहीर झालेल्या उमेदवारीला हिंगोलीतील स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध होता. त्यामुळेच त्यांचे तिकीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कापल्याचे म्हटले जाते. पाटील यांनी उमेदवारीसाठी शिंदेंकडे जोरदार मोर्चेबांधणी केली होती, त्यांचे नावही जाहीर करण्यात आले होते. तिकीट कापले 
जाण्याच्या हालचाली दिसताच त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शक्तिप्रदर्शन केले होते. पण शेवटी त्यांचे तिकीट कापून बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली. राजश्री पाटील आणि कदम या दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आले.  मुख्यमंत्री शिंदे हे गुरुवारी उमेदवारी अर्ज भरताना यवतमाळ व हिंगोलीला उपस्थित राहणार आहेत.  

तिरंगी लढत
भावना गवळी यांच्या नावाला संजय राठोड यांनी विरोध केला होता. त्यावर राठोड यांनी लढावे असा त्यांना पक्षाकडून सुचविले गेले पण राठोड लढायला तयार नव्हते. ‘मै मेरी झांसी नही दुंगी’ असे भावना गवळी म्हणाल्या होत्या. तिकिटासाठी गवळी गेले पाच दिवस मुंबईत तळ ठोकून होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्या भेटल्या. मात्र, त्यांना संधी नाकारण्यात आली. या मतदारसंघात आता जयश्री पाटील आणि उद्धवसेनेचे संजय देशमुख, वंचितचे सुभाष पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. 

राजश्री यांचे माहेर यवतमाळचे
राजश्री पाटील अध्यक्ष असलेल्या गोदावरी अर्बन क्रेडिट सोसायटीच्या राज्यभर शाखा आहेत. महिला बचत गटांचे त्यांचे जाळे आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील सारंगपूर हे त्यांचे माहेर आहे. त्यांचे वडील बाबासाहेब महल्ले पाटील हे राज्य पोलिस पाटील संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते.

बंडखोरी केलेल्या कदमांचा असाही ट्विस्ट
हेमंत पाटलांच्या जागी उमेदवारी मिळालेले बाबूराव कदम यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकत्रित शिवसेना असताना बंडखोरी केली. ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काँग्रेसचे माधवराव जवळगावकर जिंकले. शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. आता तेच आष्टीकर उद्धव सेनेचे उमेदवार आहेत तर कदम हे शिंदेसेनेचे. 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Hemant Patal's ticket cut, Bhavana Gawli's address also cut, dramatic developments in Shindesena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.