Maharashtra Election 2019: 'दलालांना स्थान देऊ नका; कणकवलीचं पार्सल रिटर्न पाठवा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 20:41 IST2019-10-18T20:39:01+5:302019-10-18T20:41:18+5:30
Maharashtra Election 2019: संजय राऊत यांचा घणाघात; राजन तेलींवर कडाडून टीका

Maharashtra Election 2019: 'दलालांना स्थान देऊ नका; कणकवलीचं पार्सल रिटर्न पाठवा'
सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघ हा शांततामय आहे. येथे कुणाची दादागिरी खपवून घेऊ नका. कणकवलीचे पार्सल कणकवलीला पुन्हा पाठवून द्या. या भूमीत दलालांना स्थान देऊ नका, अशी जोरदार टीका शिवसेना नेते खासदार संजय राउत यांनी केली. सावंतवाडी येथे जाहीर प्रचारसभेत राऊत बोलत होते. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अरूण दुधवडकर, शैलेश परब, अनारोजीन लोबो, बाबू कुडतरकर, वसंत केसरकर आदी उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, सावंतवाडीचा विकास हा खऱ्या अर्थाने करण्यात केसरकरांचा वाटा मोठा आहे. पण काहींना सगळीकडेच राजकारण दिसते. त्याला तुम्ही आणि आम्ही काय करणार पण आता गप्प बसून चालणार नाही, सर्वांनी पेटून उठले पाहिजे जर हे असेच चालू राहिले तर मागील काही वर्षात कणकवलीची स्थिती झाली तशी ती सावंतवाडीची होईल, त्यामुळे आता सर्वांनी कामाला लागा आणि कणकवलीचे पार्सल कणकवलीला पुन्हा पाठवून द्या, या भूमीची एक ओळख आहे. येथे दलालांना अजिबात स्थान देऊ नका, असे आवाहनही यावेळी खासदार राऊत यांनी केले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला स्वाभिमान आता भाजपमध्ये विलीन केल्याने स्वाभिमान शब्दाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पण आम्ही या राणेंचा दोनदा पराभव केला असून, आता कणकवलीत मुलाचाही पराभव करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार विनायक राऊत म्हणाले, केसरकर हे निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कोणी कितीही आरोप प्रत्यारोप करू दे, पण तेलीवर विश्वास ठेवणार नाही. कणकवलीतून येथे येऊन राजकारण करू नका, येथील जनता हुशार आहे, असा टोलाही राऊत यांनी हाणला. जान्हवी सावंत यांनी तेलीवर अनेक गुन्हे आहेत. पण त्यांनी ते लपवून ठेवल्याची टीका केली आहे. पण एक ना एक दिवस यांचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल. कणकवलीतील जनता यांना विचारत नाही म्हणून ते आता सावंतवाडीत येऊन राजकारण करू पाहात आहेत. असा आरोपही सावंत यांनी यावेळी केला