लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य
By सदानंद नाईक | Updated: November 15, 2024 19:53 IST2024-11-15T19:50:26+5:302024-11-15T19:53:08+5:30
Raj Thackeray Ulhasnagar Speech: भिवंडी ग्रामीणला तब्येत बिघडल्याने, त्यांनी सभे ऐवजी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे उल्हासनगर येथील सभेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते.

लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य
- सदानंद नाईक
उल्हासनगर : निवडणुकीत पैसे दिल्यास घ्या, कारण त्यानेही कोणाला तरी लुटले आहे. लुटणाऱ्याला लुटलेले चालते. असे उल्हासनगर येथील सभेत राज ठाकरे यांनी नागरिकांना आवाहन केले. शहरांची अवस्था बकाल असून दिलेल्या मताचे अपमान करणाऱ्याचा बदला घ्या. असे ठाकरे सभेत म्हणाले.
उल्हासनगर येथील अंटेलिया येथील मैदानात मनसेकडून पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन केले होते. भिवंडी ग्रामीणला तब्येत बिघडल्याने, त्यांनी सभे ऐवजी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे उल्हासनगर येथील सभेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. सभेला आलेल्या राज ठाकरे यांनी फक्त १५ ते २० मिनटे भाषण केले असून सकाळी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्याचे सांगितले. नागरिकांना लागणाऱ्या मूलभूत सुखसुविधा नागरिकांना उपलब्ध व्हाव्या. ही माफक अपेक्षा जाहीरनाम्यात असल्याचे ठाकरे म्हणाले. गेल्या पाच वर्षातील राजकारणाचा खेळ बघितला असता त्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला. आमदार विकले जातात. तुम्हच्या मतांचा अपमान केला असून अपमानाचा बदला घेण्याची ही वेळ आहे. असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
निवडणुकीत प्रस्थापित राजकीय नेते पैसे वाटतील, ते घ्या, त्यांनीही कोणाला तरी लुटले असून त्यांना तुम्ही लुटा. मात्र मते इंजिनला द्या. असेही आवाहन ठाकरे यांनी भर सभेत केले. शहरात येताना शहर बकाल झाल्याचेही राज ठाकरे म्हणाले. अंटेलिया येथील सभेला गर्दी जमल्याने, मनसेतील उत्साह निर्माण झाला आहे.