जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:15 IST2024-11-14T15:07:58+5:302024-11-14T15:15:28+5:30
Nitin Gadkari News: मुख्यमंत्री कोण होणार यावरून उद्धव ठाकरे की नाना पटोले की अन्य कोणी यावरून मविआत चर्चा रंगत असताना महायुतीत शिंदे की फडणवीस की अजित पवार अशीही चर्चा रंगत आहे.

जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण यापेक्षा पुढील मुख्यमंत्री कोणाचा याची जोरदार तयारी मविआ, महायुतीकडून सुरु झाली आहे. अशातच मुख्यमंत्री पदासाठी कोण कोण इच्छूक आहेत, कोण होऊ शकते याचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे की नाना पटोले की अन्य कोणी यावरून मविआत चर्चा रंगत असताना महायुतीत शिंदे की फडणवीस की अजित पवार अशीही चर्चा रंगत आहे. अशातच काही दिवसांपासून भाजपाची इतर राज्यांतील रणनिती पाहता नितीन गडकरींना देखील मुख्यमंत्री केले जाऊ शकते, असेही अंदाज वर्तविले जात आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न झी न्यूजच्या मुलाखतीत गडकरींना विचारण्यात आला. यावर गडकरींनी मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार नाही, तसेच मला व्हायचेही नाही. जरी कोणी मला मुख्यमंत्रीी केले तरीही मी होणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत गडकरींनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही असे सांगितले आहे. पक्षाचे वरिष्ठ ठरवतील, असेही त्यांनी उत्तर दिले.
उद्धव ठाकरेंना दरवाजे बंद आहेत का या प्रश्नावर गडकरींनी थेट उत्तर देणे टाळले. या निवडणुकीत आमची युती आहे, आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत. आमचा सध्या फोकस यावरच आहे, असे गडकरी म्हणाले.
संघ ही सांस्कृतिक संघटना आहे, संघाच्या काही स्वयंसेवकांना राजकारणाची चांगली जाण आहे. त्यांना वाटेल त्या विचारधारेसाठी ते काम करतात. ज्यांना भाजपची विचारधारा आवडते ते त्याचे काम करत आहे. काहींना आवडत नाही ते करत नाहीत, असे गडकरींनी काँग्रेसच्या आरोपांवर स्पष्ट केले.