जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 15:52 IST2024-11-01T15:51:49+5:302024-11-01T15:52:22+5:30
Manoj Jarange vs Laxman Hake: दोन दिवसांत कोणता उमेदवार निवडणूक लढविणार आणि कोणाला पाडायचे याची माहिती जरांगे जाहीर करणार आहेत.

जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी मराठा उमेदवार उभे केले आहेत. दोन दिवसांत कोणता उमेदवार निवडणूक लढविणार आणि कोणाला पाडायचे याची माहिती जरांगे जाहीर करणार आहेत. याला प्रत्यूत्तर देण्यासाठी ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाकेंनीही तयारी केल्याचे जाहीर केले आहे.
4 तारीखला जरांगे उमेदवार देणार नाहीत, तर हॉस्पिटलला अॅडमिट असतील असे सांगताना मराठ्यांच्या यादीला ओबीसींची यादी आम्ही तयार केल्याचे हाके म्हणाले. आनंदराज आंबेडकर यांनी त्यांच्या मुलाला आमच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीला पाठवले होते. ओबीसी आरक्षणाबाबत जरांगेंची भूमिका त्यांना मान्य आहे का? असा सवाल हाके यांनी आंबेडकर यांना केला आहे.
जरांगे आज एक बोलतील आणि उद्या एक बोलतील. जरांगे यांनी उमेदवार उभे करावेत, मी वाट बघतोय. कुठल्या लोकांना मतदान करायचे नाही त्याची यादी तयार आहे. काही ठिकाणी आमचे उमेदवार आहेत. जरांगेंना राजकारणातील ज्ञान शून्य आहे, काहीही बरळत बसतात अशी टीका हाके यांनी केली आहे.
प्रत्येकजण जरांगेंची भेट घेण्यासाठी जातोय. म्हणजे ओबीसींकडे या राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी, नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे असाच याचा अर्थ आहे. ओबीसींना माझी विनंती आहे की आता जर तुम्ही घरात बसलात तर 2024 नंतर ओबीसींचे आरक्षण संपलेले असेल. आम्ही ओबीसींना योग्य ती दिशा दिली आहे आणि ते मतपेटीतून दाखवून देतील, असा इशारा हाके यांनी राजकारण्यांना दिला आहे.