“मोदीसाहेब भाषणे देण्यात हुशार, पण शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकणार नाही”: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 15:21 IST2024-11-10T15:19:44+5:302024-11-10T15:21:13+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

“मोदीसाहेब भाषणे देण्यात हुशार, पण शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकणार नाही”: शरद पवार
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. आश्वासने, शब्द, गॅरंटी, वचने दिली जात आहे. केंद्रातील नेते, पदाधिकारी राज्यात येऊन प्रचार करत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शरद पवार हेही राज्यभरात दौरे करत असून, अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. तसेच पक्ष सोडून गेलेल्यांना आव्हान उभे करताना पाहायला मिळत आहे. अशाच एका प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळाले.
काही लोकांनी आमची साथ सोडली आणि भाजपाच्या पंक्तीत गेले. आधी सांगत होते विकासासाठी गेलो आहोत. मात्र आता भुजबळ नावाचे मंत्री आहेत. ते सांगत आहेत, ईडीच्या भीतीने, मला तुरुंगात टाकले होते, म्हणून आम्ही भाजपासोबत गेलो. एक प्रकारे लाचारीच दर्शन घडले आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे, असे आवाहन शरद पवार यांनी उपस्थितांना केले.
मोदीसाहेब भाषणे देण्यात हुशार, पण शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकणार नाही
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता. मात्र, आता पंतप्रधान मोदी असे निर्णय घेऊ शकणार नाहीत. कारण ते भाषण करण्यात हुशार आहेत. मात्र, निर्णय घेण्यात नाहीत, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच ओमराजे निंबाळकर तुमची गोष्ट आजिबात पटली नाही. या वयातही फिरतो असे तुम्ही म्हणालात, मी काय म्हातारा झालो का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. शांत बसणार नाही, असा निर्धार शरद पवार यांनी बोलून दाखवला.
दरम्यान, मविआतील मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीबाबत बोलताना, आम्ही महाविकास आघाडीतील नेतेमंडळी बसून यावर चर्चा करू. जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल त्यांचा नेता मुख्यमंत्री होईल. ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा येतील, आम्ही त्यांना विनंती करू की तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडा, आमचा त्याला संपूर्ण पाठिंबा असेल. याचाच अर्थ ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल. माझ्या पक्षाचे हेच धोरण आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आणि महाविकास आघाडीची सत्ता आल्यास कोणाचा मुख्यमंत्री होणार, या चर्चांना एक प्रकारे स्पष्ट उत्तर दिल्याचे सांगितले जात आहे.