“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 18:30 IST2024-11-17T18:29:44+5:302024-11-17T18:30:15+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मला सोडून गेलेले परत निवडून आले नाहीत, असा एक जुना किस्सा सांगत, आता सोडून गेलेले आहेत त्यांचे काय करायचे, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थितांना केला.

“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी शेवटचे काही तास राहिले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे राज्यातील आणि केंद्रातील नेते जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. साधेसुधे नाही, तर जोरात पाडायचे. संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे, असा एल्गार शरद पवार यांनी एका प्रचारसभेत बोलताना केला.
१९८० मध्ये माझे असेच ५८ आमदार निवडून आले होते. मी तेव्हा परदेशात गेलो आणि परत आल्यावर पाहतो तर ५८ पैकी ५२ आमदार मला सोडून गेले होते. मग तीन वर्ष पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढला आणि सर्व नवीन नवीन दमाचे उमेदवार उभे केले. मला सोडून गेलेल्या ५२ पैकी एकही आमदार परत निवडून आला नाही, असा किस्सा सांगता मग आता हे जे सोडून गेलेले आहेत त्यांचे काय करायचे? गेलेले सगळे पाडायचे, असे निर्धार शरद पवार यांनी बोलून दाखवला.
आपल्याला जे जे सोडून गेले आहेत यांचे आता काय करायचे?
आम्हाला ४० वर्ष साथ दिली म्हणतात, पण ते आता सोडून गेले आहेत. त्याचे काय करायचे? असा प्रश्न शरद पवारांनी सभेत केला. यावेळी त्यांना पाडायचे असे उत्तर गर्दीतून आले. सोडून गेलेल्यांना असे तसे, साधेसुधे पाडायचे नाही तर जोरदार पाडायचे, महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे. लोळत पाडा. कोणाचाही नाद करा पण शरद पवारांचा नाद करायचा नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, महाविकास आघाडीने जाहीर केलेली पंचसूत्री प्रत्यक्षात राबवण्यासाठी तुमची मदत हवी आहे. महाराष्ट्राचे सरकार महिलांविरोधी आहे, तरुणांविरोधी आहे, शेतकऱ्यांविरोधी आहे. सर्वांच्या हिताची जपणूक करण्याची दृष्टी या सरकारची नाही. हे सगळे बदलायचे असेल तर सरकार बदलले पाहिजे. ते काम करायचे असेल तर उद्याच्या २० तारखेला सगळ्यांना एकच निकाल घ्यावा लागेल. लोकसभेची निवडणूक झाली, आता विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा? याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी तुम्ही विजयी करा. माझी खात्री आहे की, महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन शरद पवार यांनी केले.