“मराठा समाजाला त्रास दिला, आता नक्की पडणार, भाजपाचे...”; मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 19:19 IST2024-11-09T19:18:25+5:302024-11-09T19:19:25+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकसभेवेळी मराठा समाजाला सन्मान होता. विधानसभेला सन्मान असणार आहे. माझे मत समाजावर लादू शकत नाही. त्यांना अडचणी येतील, असे मला वागायचे नाही, असे मनोज जरांगे म्हणालेत.

“मराठा समाजाला त्रास दिला, आता नक्की पडणार, भाजपाचे...”; मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मराठा समाजाची मुले अडचणीत आहेत. आरक्षण नसल्यामुळे आणि शेती मालाला भाव नसल्यामुळे आमचेच लोक अडचणीत आहे. त्यासाठी हा संघर्ष करायचा आहे. आपला आरक्षणात जीव आहे आणि आरक्षणापासून भूमिका बदलत नाही. मराठा समाज शंभर टक्के आरक्षण देऊन मोकळा करायचा आहे. निवडणुकीत मोठा होण्यासाठी रडारड करणारे खूप आहेत, त्यांनी ही रडारड समाजाच्या आरक्षणासाठी करावी, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालल्याचे अनेक ठिकाणी दिसले. आता विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर चालणार का, कुठे चालणार, किती प्रभाव असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. परंतु, ऐनवेळी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. परंतु, पाडापाडी होणार हे आवर्जून स्पष्ट केले. यानंतर आता मनोज जरांगे यांनी किती जणांना पाडणार याचा थेट आकडाच सांगितला आहे.
मराठा समाजाला त्रास दिला, आता नक्की पडणार
मराठा समाज निवडणुकीमध्ये सक्रीय आहे. त्यांना काय करायचे ते बरोबर कळते. ते वाट बघत असले तरी वेळेवर बरोबर काम करणार आहे. आम्ही सावधच आहोत आणि आमचे आंदोलन सुरू करणार आहोत. आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहेत आणि सहा कोटी मराठ्यांना खेटणे सोपे नाही, असा निर्धार मनोज जरांगेंनी बोलून दाखवला. उमेदवार पाडण्याच्या यादीत ११३ जण आहेत. ज्यांनी मराठा समाजास त्रास दिला, ज्यांनी मराठा समाजाच्या मुलांकडे पहिले नाही, त्यांना मराठे पाडू शकतात. आपण भाजपचे नाव घेतले नाही. आपण फक्त ११३ पडणार आहे, असे म्हणालो आहे. मी समाजाला सरळ सांगितले आहे, कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडून आणा. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मराठा समाजाला सन्मान होता. आता विधानसभेला मराठा समाजाला सन्मान असणार आहे. परंतु माझे मत समाजावर लादू शकत नाही. त्यांना अडचणी येतील, असे मला वागायचे नाही. कोणाला पाडा कोणाला निवडून आणा, ते बरोबर त्यांच्या हिशोबाने चालतील, असे जरांगे म्हणाले.
दरम्यान, वैयक्तिक कोणाला सांगणे म्हणजे समाजाला संकटात आणण्यासारखे आहे. उद्या सत्ता कोणाची येऊ द्या, दोन हात करायची ताकद मराठा समाजामध्ये आहे. आम्ही आमच्या आरक्षणासाठी लढणार आहोत. आम्हाला राजकारणाचा नाद लावून घ्यायचा नाही. मी स्पष्ट सांगितले आहे. कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा, मराठा समाजाला एकदा आयुष्याचे आरक्षण द्यायचे आहे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले.