देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेस वापरतेय कर्नाटकचा ब्रेन? सांगितली मविआची स्ट्रॅटेजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 14:09 IST2024-10-30T14:09:26+5:302024-10-30T14:09:53+5:30
Devendra Fadanvis: लोक मला विसरूच शकले नाहीत, याचा परिणाम असा झालाय की लोक फडणवीसना शक्तीमान नेता मानू लागले आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेस वापरतेय कर्नाटकचा ब्रेन? सांगितली मविआची स्ट्रॅटेजी
गेल्या काही महिन्यांपासून मविआकडून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात आहे. या विरोधकांच्या रणनितीवर फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला आहे. भाजप हा महायुतीचा ताकदवान पक्ष आहे. यामुळे भाजपाचे नुकसान केल्याशिवाय महायुतीची ताकद कमी होणार नाही. यामुळे फडणवीसांवर हल्ला करण्याचा सल्ला कर्नाटकहून आलेल्या स्ट्रॅटेजिस्टने काँग्रेसला दिल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.
यामुळे मविआच्या नेत्यांकडून माझ्यावर वैयक्तिक हल्ले चढविले जात असल्याचेही फडणवीस म्हणाले. विरोधक माझ्यावर सकाळ ते संध्याकाळ हल्ला करतात. त्यांनीच मला नेहमी सेंटर स्टेजला ठेवले आहे. यामुळे लोक मला विसरूच शकले नाहीत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
याचा परिणाम असा झालाय की लोक फडणवीसना शक्तीमान नेता मानू लागले आहेत. कर्नाटकातून आलेल्या स्ट्रटेजिस्टने विरोधकांना माझ्यावर हल्ला करा, प्रतिमा मलिन करा, वैयक्तीक टीका करा, असा सल्ला दिला आहे. यानुसार हे चालू असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
अनिल देशमुखांनी आताच माझ्यावर आरोप करायला का सुरुवात केली असेल, काँग्रेस, शरद पवार आणि शिवसेनेच्या थिंकटँकने मला व्हिलन करण्याची स्ट्रॅटेजी आखली असल्याचे आपल्याला समजले असल्याचेही फडणवीस म्हणाले. तसेच महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल हे निकाल आल्यानंतरच ठरविले जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. याचबरोबर रोटेशनल मुख्यमंत्री असावा अशी काही अट शिंदेंनी ठेवली नसल्याचेही ते म्हणाले.